
काळम्मावाडी धरणाच्या दूधगंगा नदीवरील उजव्या कालव्यात पाण्याच्या शोधात आलेल्या रानगव्यांचा कळप पडला. यात एका गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर रानगवे सुरक्षितपणे बाहेर पडले. कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली.
उंदरवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या एन. के. जाधव यांना दहा ते बारा रानगव्यांचा कळप कालव्यात पडून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत असलेला दिसला. कालव्याचे अस्तरीकरण झाल्याने रानगव्यांना बाहेर पडणे अडचणीचे झाले. या रानगव्यांना वाचविण्यासाठी जाधव यांनी त्यांना हाकलले व उंदरवाडी कालव्याच्या लाकडी पुलाजवळ असणाऱया कच्च्या भागापर्यंत आणले. तेथून हे गवे बाहेर पडले आणि उंदरवाडीच्या जंगल भागात गेले. मात्र, यात एका रानगव्याचा बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील रंगराव कुदळे, भूषण पाटील, संभाजी पाटील, अनिकेत कुदळे यांनी मृत रानगव्याला वाहत्या पाण्यातून बाहेर काढले.
उंदरवाडीच्या सरपंच भारती संजय पाटील व पोलीस पाटील दीपाली हिंदुराव परीट यांनी घटनेची माहिती वनखात्याला दिल्यावर वन विभागाचे बी. एन. शिंदे, डॉ. गजानन मोडवन, पी. पी. भोसले, शिवाजी बरगे व कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत रानगवा 14 वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.
यावर्षी 2 जानेवारीला याच ठिकाणी सात रानगव्यांचा कळप कालव्यात पडला होता. गुरुवारी दहा ते बारा रानगव्यांचा कळप कालव्यात पडून त्यातील एका रानगव्याचा मृत्यू झाला. वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने जंगलातील प्राण्यांचा अधिवास संकटात आला आहे. वन विभाग व पाटबंधारे विभागाने यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी.
– एस. के. पाटील, निसर्ग अभ्यासक, उंदरवाडी
































































