
मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी खड्ड्यांची समस्या आहे. खड्डे भरण्याचे कंत्राट वारंवार पालिकेकडून काढण्यात येत आहे. अशातच गणेशोत्सवाला अवघा महिना उरला आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी विसर्जन रस्त्यांवरील खड्डे तत्काळ भरण्यात यावेत, तसेच रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी आग्रही मागणी आज बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली. तसेच विसर्जन मार्गांवरील फांद्यांची छाटणी करावी आणि लटकणाऱ्या केबल्स काढाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महापालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयात आज बैठक पार पडली. कौशल्य विकास मंत्री तथा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार ही बैठक झाली. बैठकीला उपायुक्त चंदा जाधव, समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, सहसचिव शिवाजी खैरनार, ओंकार सावंत, तसेच ७० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अग्निशमन दल तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी सर्व परवानग्या पुढील पाच वर्षे अबाधित ठेवण्यात याव्यात, रस्त्यावरील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवावेत, विसर्जनस्थळी लाईफगार्डच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करावी, गणेश मंडप परिसरातील वाहन पार्किंगची समस्या मार्गी लावावी, गिरगाव चौपाटी येथे विसर्जन स्थळी स्टील प्लेट्सची संख्या वाढवावी, आदी मागण्या समितीने केल्या.
गणेशोत्सव मंडळांची मागणी लक्षात घेता त्यांना ‘एक खिडकी योजना’ (वन विंडो) अंतर्गत पालिका, पोलीस व वाहतूक परवानग्या देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना मंगल प्रभात लोढा यांनी केल्या. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून देण्याचे आवाहन त्यांनी मंडळांना केले.
ऑगस्ट क्रांती मैदानात मोठा कृत्रिम तलाव
समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्याबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला, तरी गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी सरकार व प्रशासन ठामपणे उभे राहील. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अधिकाधिक भव्य कृत्रिम तलाव निर्माण करावेत, असे निर्देशदेखील मंत्री लोढा यांनी प्रशासनाला दिले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे ५ ते ६ फूट खोलीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्यात यावा, तसेच अन्य संभाव्य विसर्जनस्थळांचीही पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
पालिकेकडून कामांना सुरुवात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ‘डी’ विभागाकडून गिरगाव चौपाटीवर विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवरील वाळूमध्ये वाहने रुतू नयेत यासाठी १,१९४ प्लेट्स वाळूमध्ये बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चौपाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दी आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांसाठी वॉच टॉवरचीही व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.





























































