
सामना ऑनलाईन । नगर
मुरमी तालुका शेवगांव येथे दरोड्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी 10,000 रुपये रोख रक्कम आणि 50,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे असा एकूण 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह शेवगांव पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सहीर चव्हाण (वय 32, रा.चिचोंडी पाटील, ता.नगर), विकास भोसले, राठोड चव्हाण (रा.चिचोंडी पाटील), धर्मा भोसले (रा.उमापूर, ता.गेवराई, जिल्हा बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
9 नोव्हेंबरला आशाबाई गाडीवान (वय 55, रा.मुरमी शिवार, ता.शेवगांव) हे त्यांचे पती मुलासह घरासामरे झोपले असताना अज्ञात आरोपींनी आशाबाई यांचे पती लहानू गाडीवान यांच्यावर चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. घरातील लोकांना ठार मारण्याच्या धमक्या देत घरातील 50,000 हजाराचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 04 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता. आशाबाई गाडीवान यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी मुरमी तालुका शेवगांव येथे दरोडा टाकून सोने व रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली आहे. चोरीस गेलेल्या मालापैकी 60 हजार रुपये किंमतीचे ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. मंगळवारी रोजी पोलीस नाईक ज्ञानेश फतरे, पोलीस हेड कॉस्टेबल दत्ता हिंगणे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रविंद्र कर्डीले, भागीनाथ पंचमूख, सुनिल चव्हाण, रवि सोनटक्के, योगेश सातपुते, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, दिपक शिंदे, चालक बाबासाहेब भोपळे यांनी मोठ्या शिताफीने आरोपी पळून जात असताना अटक केली.

































































