सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप, सायना, कश्यपची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

फुलराणी सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप या स्टार हिंदुस्थानी खेळाडूंनी सय्यद मोदी चॅम्पियनशिप या वर्ल्ड टूर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. मात्र प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या विद्यमान चॅम्पियन आणि ‘नंबर वन’ हिंदुस्थानी जोडीला मिश्र दुहेरीत सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

तीन वेळची चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित सायना नेहवाल हिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मॉरिशसच्या केट फू कून हिचा 21-10, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. पुरुष एकेरीत पी. कश्यपने थायलंडच्या तानोंगसाक सेनसोबून्स्कचा एकतर्फी लढतीत 21-14, 21-12 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. बी. साई प्रणीतनेही पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार केला. त्याने रशियाच्या सर्गेई सिरांतला 21-12, 21-10 असे हरवले, तर शुभंकर डे याने स्वीडनच्या फेलिक्स बुरेसटेटचा 21-15, 21-13 असा पराभव केला. माजी राष्ट्रीय चॅम्पियन रितुपर्णा दास हिने रशियाच्या नतालिया पेरमिनवोवा हिला 21-19, 18-21, 21-10 असे हरवले.

मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी जोडीला चीनच्या रेन झिगांयु व झोऊ चाओमिन या जोडीकडून 14-21, 11-21 असा पराभवाचा धक्का बसला. चिनी जोडीने केवळ 31 मिनिटांत ही लढत जिंकून दुसरी फेरी गाठली. सात्विक राईराज रंकीरेड्डी व अश्विनी पोनप्पा या सहाव्या मानांकित हिंदुस्थानी जोडीने आपल्याच देशातील कृष्णा प्रसाद गर्गा व ऋतुपर्णा पंडा जोडीचा 21-10, 21-10 असा पराभव करून विजयी सलामी दिली. याचबरोबर प्राशी जोशी, शैली राणे, रिया मुखर्जी, श्रेयांसी परदेशी, रेश्मा कार्तिक व साई उत्तेजिता राव चुक्का या हिंदुस्थानी महिला खेळाडूंनीही एकेरीच्या दुसऱया फेरीत प्रवेश केला.