Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे आषढी एकादशीच्या पर्वात श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यास 30 ते 40 तास लागतात. त्यामुळे भाविकांनी आषाढीपूर्वीच दर्शनाला गर्दी केली आहे. गोपाळपूर पत्रा शेडमध्ये दर्शन रांग पोहचली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागत आहे. दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत.

दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने दोन दिवसांपूर्वी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी चोख सुरू होती. पण शिंदे गटाचे खासदार संदीपान भूमारे हे आपल्या पन्नास कार्यकर्त्यांना घेवून मंदिराच्या व्हीआयपी गेटजवळ आले. शॉर्टकट दर्शनासाठी सर्वांना सोडा, असा आग्रह त्यांनी पोलिसांना केला. तथापि पोलिसांनी व्हीआयपी दर्शन बंद आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात एकटे जावू शकता, अशी विनंती केली.
मात्र, सर्वांनाच सोडा, असा आग्रह भुमरे धरून बसले. यातून पोलीस आणि भूमरे यांच्यात शाब्दिक वाद झाले. शेवटी मंदिर समितीचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी घटनास्थळी आले. भुमरेच्या दमबाजीला घाबरून त्यांनी 25 हून अधिक जणांना व्हीआयपी दर्शन दिले.

भुमरे आणि त्यांचे व्हीआयपी कार्यकर्त्यांसाठी मंदिरातील दर्शन रांग थांबविण्यात आली. ही बाब दर्शन रांगेतील भाविकांच्या लक्षात आल्यानंतर वारकऱ्यांचा संताप अनावर झाला. 10 तास आम्ही दर्शन रांगेत उभे आहोत म्हणत वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. घुसखोर… घुसखोर… अशा घोषणा देत वारकऱ्यांनी भुमरे यांना डिवचले. तरीही चेहऱ्यावर निर्लज्ज हास्य आणत भुमरे आणि त्यांचे कार्यकर्ते मंदिरातून बाहेर पडले.