शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे नेते आहेत तोपर्यंत महाराष्ट्र दिल्लीपुढे कधी झुकणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावलं

महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून त्याच्यावर धनीकांची, व्यापाऱ्यांनी वक्रदृष्टी कायम मुंबईवर राहिली, ती आजही आहे. आजच्या महाराष्ट्र दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल मध्यरात्री हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले. त्यांनी हुतात्म्यांना आणि महाराष्ट्रातील लढ्यातील सर्व योद्ध्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्राचं अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबप्रमाणे महाराष्ट्रावर होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडली आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदर संजय राऊत यांनी केला.

काही भटकते आणि काही वखवखलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडताहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे, अधिकाराचे लचके तोडताहेत. महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जातंय. लढवय्या महाराष्ट्राला नामर्द करण्याचा कट आहे. मात्र शिवसेना इथे जोपर्यंत ठामपणे उभी आहे, तोपर्यंत त्यांना हे शक्य नाही. म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली, शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहे आणि लढेल. आजच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत आहे. राज्यात फिरतोय, तेव्हा आम्हाला हे दितसंय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा, तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, त्या आधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर पाहून यावी. आणि 107 हुतात्म्यांचं स्मारक जे मुंबईत फोर्टमध्ये आहे तेही पाहून यावं. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते, त्याची ही दोन प्रतिकं आहेत, असा घणाघात Sanjay Raut यांनी केला.

भाजप, मिंधे आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रात स्थान नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महाराष्ट्र हा दिल्लीपुढे कधी झुकला नाही, हा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून चिंतामणराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र झुकला नाही, महाराष्ट्र आपल्या स्वाभिमानासाठी लढत राहिला. पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरण ठेवल्या आहेत. याला थैलिचं राजकारण म्हणतात. मुंबईतल्या लुटीचा माल दिल्लीच्या चरणी वाहायचा आणि महाराष्ट्रात सत्ता भोगायची, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे. भाजपला महाराष्ट्राशी कधीच देणं-घेणं नव्हतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भाजपने पुढाकार घेतला असेल तर, ते त्यांनी दाखवावं. ना स्वातंत्र्याच्या, ना देशाच्या लढ्यात हे लोक कधीच-कुठे नव्हते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली होती. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसाला पाच वर्षे लढा द्यावा लागला. महाराष्ट्रासाठी 107 जणांनी प्राणांचं बलिदान दिलं. त्या हुतात्म्यांचं स्मारक जाऊन बघा. आजही तो संघर्ष संपलेला नाही. आज दिल्लीत व्यापाऱ्यांची लॉबी बसलेली आहे. ही लॉबी आजही महाराष्ट्र आणि मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आजही महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकला नाही आणि विकला गेला नाही. महाराष्ट्र विकण्याचा आणि झुकवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र जोपर्यंत इथे शिवसेना आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत तोपर्यंत हा महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही आणि विकला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

अतृप्त आत्मा पंतप्रधानपदी पुन्हा बसला तर देशाची भुताटकी आणि स्मशान होईल; संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही सातत्याने लोकसभा निवडणुकीत 21-22 जागांवर लढत आली आहे. तो आमचा आकडा कायम आहे. तीन पक्षांच्या जागावाटपातही अत्यंत सन्मानाने जागावाटप झालं, त्यात आम्ही 21 जागा लढत आहोत. 22 वी जागा जी उत्तर मुंबईची ती शेवटच्या क्षणी आम्ही काँग्रेसला लढण्यासाठी दिली. अन्यथा 22 जागांचा आमचा आकडा कायम होता. आता हा जो शिवसेना फडणवीस गट हे 12-13 जागा लढत आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःच्या सात आठ जागा कमी करून घेतल्या. याला लोटांगण घालणं म्हणतात. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाहीत. अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार भाजपने ठरवले किंवा कापले. ही काही स्वाभिमानाची गोष्ट नाही. ही एक लाचारी आहे. आपण कोणाच्या चरणाशी बसून हुजरेगिरी करतो, त्याचं हे लक्षण आहे. आम्हाला त्यात पडायचं नाही. भाजप असो किंवा शिवसेना फडणवीस गट किंवा राष्ट्रवादी फडणवीस गट असेल, त्यांचं त्यांनी पाहावं, असं संजय राऊत यांनी सुनावलं.

अजित पवार यांनी दैवत बदललं आहे. 2024 ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि पुन्हा त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी पुन्हा दैवत बदललेलं असेल. हे मोबाइल दैवत त्यांच्या मागे सतत फिरत असतं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.