कातळशिल्प संशोधनासाठी सतीश लळीत यांना पंडित सेतुमाधवराव पगडी पुरस्कार; अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने 2026 चा प्रतिष्ठेचा ज्येष्ठ इतिहास संशोधक पंडित सेतुमाधवराव पगडी पुरस्कार कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांना जाहीर केला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि सचिव प्राचार्य डॉ. सोपान जावळे यांनी ही घोषणा केली आहे. परिषदेचे 34 वे राष्ट्रीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, अहिल्यानगर येथे 8 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि रोख सात हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

परिषदेच्या वतीने 2023 पासून थोर इतिहास संशोधक, पंडित सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने उत्कृष्ट संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच कोल्हापूर येथे झाली. या बैठकीत पुरस्कारासाठी सतीश लळीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कार्यकारी मंडळाचे कोकण विभाग प्रतिनिधी व सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी लळीत यांच्या ओरोस येथील निवासस्थानी भेट घेऊन परिषदेचे निवडपत्र त्यांना दिले.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त अधिकारी सतीश लळीत गेली 26 वर्षे कातळशिल्प संशोधन करीत आहेत. 2001 साली त्यांनी सिंधुदुर्गातील हिवाळे येथील पहिल्या कातळशिल्प ठिकाणाचा शोध लावला. यानंतर कुडोपी, खोटले, मोगरणे धामापूर यासह अनेक ठिकाणी सापडलेली कातळशिल्पे त्यांनी जागतिक नकाशावर आणली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरातत्व परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. कुडोपी या कातळशिल्प ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत केला आहे.