शनिशिंगणापुरात महाद्वारासमोरील चपलांच्या ढिगाऱ्याने संताप, देवस्थानचा ढिसाळ कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुख्य महाद्वारमधून प्रवेश दिला जात आहे. महाद्वारमधून प्रवेश करताना भाविकांसाठी मोफत चप्पल स्टॅण्ड असतानाही ते अपुरे पडत असल्यामुळे भाविक महाद्वारासमोरच पायरीवर चप्पल सोडत असल्याने चपलांचा ढिगारा निर्माण होतो. देवस्थानच्या ढिसाळ नियोजनामुळे मंदिरात जाण्यासाठी अगोदर भाविकांना अस्ताव्यस्त पडलेल्या चपलांचे दर्शन होते, त्यानंतर देवाचे दर्शन घ्यावे लागते. याबाबत शनिभक्तांमधून संताप व्यक्त होत आहे.

22 सप्टेंबर 2025 रोजी शनिशिंगणापूर देवस्थान शासनाने ताब्यात घेतले. शासनाच्या विरोधात विश्वस्तांनी संभाजीनगर खंडपीठात दाद मागितली, सुप्रीम कोर्टात निकालावर अपील झाल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रशासकांच्या वतीने कार्यकारी अधिकारी म्हणून अतुल चोरमारे व प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यानच्या, काळात येथील कारभार शासकीय अधिकाऱयांच्या ताब्यात असल्याने धोरणात्मक निर्णयाऐवजी केवळ दैनंदिन कारभारावरच अधिकाऱयांचा भर आहे.

दर्शन व्यवस्थेत बदल करून शनिमूर्तीपर्यंत जाण्यासाठी केवळ एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवले आहे. या प्रवेशद्वारातून भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. भुयारी मार्गामध्ये व्हेंटिलेशन सुविधेशिवाय एक्झिट सुविधा नसल्याने मागील महिन्यात झालेल्या यात्रा काळात भाविकांना मोठा त्रास होऊन अनेकांना भोवळ आल्याचे प्रकार घडले होते.

अधिकाऱ्यांनी कर्मचाऱयांना शिस्तीचे पालन करण्याचे आदेश फर्मावले असतानाही महाद्वार येथील सुरक्षा कर्मचारी याकडे करीत असलेले दुर्लक्ष, तसेच मोफत चप्पल स्टॅण्ड अपुरे पडत असल्याने आलेले भाविक आपली चप्पल महाद्वारच्या फरशीवरच सोडतात. त्यामुळे येथे चपलांचा ढिगारा निर्माण होतो. सध्या देवस्थानचा कारभार ढिसाळ पद्धतीने सुरू असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याने शनि देवस्थानचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

गावकरी गेट, सुरक्षा कर्मचारी हतबल

सध्या मंदिरात मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश सुरू आहे. मागील महिन्यात गेट नंबर दोन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले, तसेच गावकरी गेट हे फक्त केवळ शनिशिंगणापूर गावातील रहिवाशांना खुले ठेवण्यात आले आहे. या गेटमधून येथील नागरिक प्रवेश करतात. या गेटवर व्हीआयपी व भाविक यांची नेहमी वादावादी, तसेच भांडणे होत असल्याने येथील सुरक्षा कर्मचारी हतबल झाले आहेत.