तरुण पिढीत नैराश्य असेल तर देशाचे नुकसान- शरद पवार

 

‘दोन कोटी नोकऱया देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु केवळ सात लाख मुलांना नोकरी मिळाली आहे. सरकारच्या खोटय़ा आश्वासनांमुळे तरुणांमध्ये नैराश्य मोठय़ा प्रमाणात दिसते. स्पर्धा परीक्षा वेळेवर होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.  मात्र, सरकार शहाणपण दाखवीत नाही. तरुण पिढी निराश असेल, तर देशाचे मोठे नुकसान आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ‘अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी तरुणांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी आमदार अशोक पवार, रवींद्र धंगेकर, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, चंद्रकांत मोकाटे, मधुकर कोकाटे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, सध्या शासकीय सेवेत पंत्राटी पद्धतीने जी कामगारभरती केली जात आहे, ती बंद झाली पाहिजे. प्रशासकीय सेवेतील भरती ही एमपीएससीमार्फतच झाली पाहिजे.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, जे बुद्धी चालविणार नाहीत, असे तरुण या सरकारला पाहिजेत. एक व्यापारी लॉबी देशात काम करीत आहे. देशाला व्यापारी लॉबीतून मुक्त करण्यासाठी तरुणांनी निवडणूक हातात घेणे जरुरीचे आहे. मोदी, शहा यांचे सरकार घालविण्याची ही वेळ आहे.’

मुलींना सैन्यात स्थान मिळाले

‘मी संरक्षणमंत्री असताना बाहेर देशात गेल्यानंतर त्या देशातील सैन्य दलात मोठय़ा प्रमाणात मुली असल्याचे बघायला मिळाले; पण आपल्याकडे सैन्य दलात मुली नव्हत्या. मी संरक्षणमंत्री असताना सैन्यात मुलींना स्थान देण्याचा निर्णय घेतला असेही पवार म्हणाले.