
तीन महिन्यांपूर्वी स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली म्हणणाऱ्यांचा स्वाभिमान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज आव्हान देतायेत तेव्हा कुठे गेला? खरंच स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सरकारने कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यावी, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. जत, अक्कलकोटनंतर सुरगाण्यात शेजारील राज्यात जाण्याचा उठाव होतोय, याला कारण सरकारकडे जनतेच्या प्रश्नांसाठी वेळच नाही. या राज्याला मुख्यमंत्री नाही, सरकार अस्तित्वात नाही, म्हणूनच परराज्याने महाराष्ट्राविरोधात हे षड्यंत्र रचलंय, असेही ते म्हणाले.
नाशिक येथे खासदार संजय राऊत शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राला आव्हान देतायेत. अशा प्रकारे आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या पन्नास-पंच्चावन्न वर्षांत झालं नव्हतं. स्वाभिमान असेल तर कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री व सरकारने जलसमाधी घ्यावी. जत, अक्कलकोट, त्यानंतर सुरगाणा महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या विचारात आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, राज्यातील मिंधे सरकार चाळीस आमदारांना जपण्यात, त्यांचं मन राखण्यात, खोक्यावर खोके वाढवण्यासाठीच जिवाचं रान करत आहे. दोन-तीन महिन्यांत गावांमध्ये उठाव झाले. कारण या सरकारचं कार्यक्षेत्र केवळ चाळीस आमदारांपुरतं मर्यादित आहे. या राज्याला मुख्यमंत्रीच नाही, सरकार अस्तित्वात नाही, हे कळलं म्हणून परराज्याने महाराष्ट्राविरुद्ध षड्यंत्र रचले. तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली, असे मुख्यमंत्री म्हणतात, पण ही क्रांती साडेतीन महिन्यांत संपू शकते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल
गुजरातच्या प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर तोंडाच्या रावणाची उपमा दिली. असं म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही. मोदी यांनी अश्रू ढाळले, हा माझा एकटय़ाचा नाही तर गुजरातचा आणि गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे असे दर्शवत पुढे निवडणूक लढवली जात आहे. इकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा या भाजपच्या माणसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची स्पर्धा सुरू आहे तरी भाजप-शिंदे गट मूग गिळून गप्प आहे. त्यांना महाराजांविषयी किती श्रद्धा, किती प्रेम, किती आस्था आहे, हे गेल्या आठ दिवसांतील आपल्यासमोरील उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, याला लवकरच उत्तर दिले जाईल, असे संजय राऊत म्हणाले.
…तर हे घटनेला आव्हान
महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखण्याचा निर्णय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते, या वृत्तावर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बेळगावात जाण्यापासून आम्हाला रोखलं, कारवाया झाल्या, हे ठीक आहे, पण मंत्र्यांनाच पाय ठेवू देत नसाल तर हे घटनेला दिलेले आव्हान आहे. देशातला नागरिक कुठेही जाऊ शकतो. या राज्यातील मंत्री त्या राज्यात, त्या राज्याचा मंत्री या राज्यात येऊ-जाऊ शकतात, पण यायचंच नाही ही मुजोरी आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झाली नाही. आताच्या क्रांतिकारक स्वयंभू सरकारच्या काळात ही मुजोरी व्हायला लागली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहीत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे. नाहीतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलावे. बोला…, नाहीतर आम्ही बोलू. सरकारला जमत नसेल तर आम्ही प्रयत्न करू आम्हाला बेळगावला जाता येतंय का?, असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

































































