
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर आज प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा प्रचंड जल्लोष उद्या 26 जुलै रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तरुणाईच्या एकजुटीचे दर्शन यावेळी घडणार आहे. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरील वीर सावरकर मार्गावर हा कार्यक्रम होईल.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर तब्बल 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात शिक्षणतज्ञ, संशोधक सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी संसदेवर धडक दिली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर प्रचंड लाठीहल्ला केला. महिलांना मारहाण, विनयभंग करण्यात आला. हे घडत असताना सरकार ढिम्म होते. याच्या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात आंदोलनाचे रान पेटले. शिवसेनेने शिवतीर्थावर केलेल्या आंदोलनाने महाराष्ट्रात आंदोलनाची ठिणगी पडली. अखेर या लढय़ाला यश आले. या पार्श्वभमूमीवर उद्या तरुणाईचा शिवतीर्थावर प्रचंड जल्लोष होणार आहे.
एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले; उद्धव ठाकरे यांच्याकडून तरुणांचे अभिनंदन
राष्ट्रगीत गुंजणार, तिरंगा डौलाने फडकणार
तरुणाईच्या जल्लोषात तरुणाईसह शिवसेना, मनसेसह सर्वपक्षीय कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यावेळी कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नसेल. या ठिकाणी फक्त हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकणार असून तरुणाई एकसुरात राष्ट्रगीत गायन करणार आहे.




























































