
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
खासदार दिलीप गांधी हे बोगस खासदार असल्याचा आरोप करणाऱ्या सुजय विखेंना शिवसेनेने सणसणीत चपराक लगावली आहे. ‘स्व. बाळासाहेब विखे यांनीच दिलीप गांधी यांना भाजपाचे तिकीट मिळून दिले होते. त्यांना निवडून आणण्यासाठीही त्यांनी प्रत्येकवेळी प्रयत्न केले. आज खासदार गांधी बोगस असल्याचे तुम्ही म्हणत आहात. तर मग ‘नगर दक्षिण’वर बोगस खासदार लादला कुणी? हे बोगस प्रॉडक्ट आपणच लॉन्च केलेले आहे’, असा टोला शिवसेना नेते घन:श्याम शेलार यांनी सुजय विखेंना लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे दक्षिण जिल्ह्यात दौरे करत आहेत. वाळकी व पाथर्डी येथे त्यांनी खा. दिलीप गांधी यांच्यावर टीका करताना गांधी हे बोगस खासदार असल्याचे म्हटले होते. घन:श्याम शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याच मुद्द्यावर विखेंना घेरले. ते म्हणाले की, ‘मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजीव राजळे यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी राजळेंना पाडण्यासाठी विखे परिवाराने एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि पुन्हा एकदा गांधीना खासदार करण्यासाठी मदत केली. आज तुम्हीच म्हणता दिलीप गांधी बोगस खासदार आहेत. तर मग हे बोगस प्रॉडक्ट आपणच लॉन्च केलेले आहे. त्यामुळे दक्षिणेतील मतदारांची विखे परिवाराने माफी मागावी, असे ते म्हणाले.
आपले आजोबा आठ वेळा खासदार झाले. वडील आमदार, मंत्री झाले. आता विरोधी पक्षनेते आहेत. मातोश्री जिल्हा परिषदेच्या दोनदा अध्यक्षा झाल्या आहेत. सुजय विखे हे स्वत: पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आता त्यांना दक्षिणेतून खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. एका बाजूला सांगतात मी प्रस्थापितांच्या विरोधात आहे. आणि दुसर्या बाजूला ४० वर्षापासून आपल्याच घरात सत्ता राखून आहेत. मग ही दिशाभूल कशासाठी? असा सवालही शेलार यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती होणार नाही. पण झाली तर पक्ष नेत्यांचा आदेश येईल तो आम्ही पाळू, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
































































