
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
महिला बचत गटांच्या सहकार्याने पडवे (कुडाळ) ग्रामपंचतीने एका दिवसात गावात १२ कच्चे बंधारे बांधत पाणी अडवा व पाणी जिरवाचा संदेश दिला आहे. महिला बचत गटांनी हे बंधारे बांधून जिल्ह्यातील इतर बचत गटांसाठी एक आदर्श निर्माण करून दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी हे पाणी अड़विण्यासाठी पक्के बंधारे नदी नाल्यांवर नसल्याने हे पाणी सरळ समुद्राला जावून मिळते. मात्र नदी नाल्यांमधील पाण्याची पातळी कमीकमी होवून में अखेरीस पाणीटंचाईच्या झळा जनतेला सोसाव्या लागतात. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून “पाणी अडवा पाणी जिरवा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात ग्रामपंचायत सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, महिला बचत गट तसेच विविध कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने वनराई बंधारे बांधण्यासाठी कामे सुरू झाली आहेत. कुडाळ तालुक्यातील पडवे गावी महिला बचत गटांनी बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बंधारे बांधण्यासाठी या गावातील १४ महिला बचत गटांनी सहभाग घेत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात १२ ठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधले आहेत. या वेळी पडवे सरपंच सुभाष दळवी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सहभाग होता.
पाणी अडविल्यामुळे वायंगणी भातशेती, भाजीपाला ही ओलीता खाली येणार आहे. तसेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत सरपंच सुभाष दळवी यांनी “पाणी आडवा,पाणी जिरवा” या उपक्रमाला लागणारी सर्व सामग्री व सिमेंटच्या पिशव्या महिला बचत गटांना परविल्या.
पडवे गावात आज बांधण्यात आलेल्या १२ बंधारे बांधन्यासाठी १४ महिला बचत गटांनी श्रमदान केले. यात सखी महिला बचत गट, भाग्योदय महिला बचत गट, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, रवळनाथ महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, गौरीगणेश महिला बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, सिध्देश्वर महिला बचत गट, संघमित्र महिला बचत गट, सुसंग महिला बचत गट, उड्डाण महिला बचत गट, आधार महिला बचत गट, ब्राह्मण देव महिला बचत गट व श्री गणेश महिला बचत गट या महिला बचत गटांनी सहभागी होत वनराई बंधारे बांधण्यासाठी परिश्रम घेतले .तर यांच्या सोबत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.

































































