दहा दिवसांत तब्बल दोन हजार तिकिटे रद्द, सोलापूर विभागाकडून रेल्वे प्रवाशांना दहा लाखांचा परतावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील दहा दिवसांपासून काढण्यात आलेल्या तिकिटांचा परतावा प्रवाशांना देण्यात येत आहे. मागील दहा दिवसांत साधारणपणे दोन हजार तिकिटे रद्द करण्यात आली असून, यातून जवळपास दहा लाखांचा परतावा आरक्षण तिकीट खिडकीद्वारे देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

फेब्रुवारीमध्ये आरक्षित करण्यात आलेली आरक्षण तिकिटे कोरोनाच्या भीतीने आणि लॉकडाऊनच्या भीतीने रद्द करण्यास प्रवाशांनी सुरुवात केली आहे. ज्या प्रवाशांनी आरक्षित तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना मागील दहा दिवसांपासून तिकीट रद्द करून तिकिटाची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून सोलापूर विभागात सर्वच आरक्षण तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करून तिकिटाचा परतावा घेण्यासाठी गर्दी होत आहे. प्रवाशांनी गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते. याला प्रवाशांनीही प्रतिसाद दिला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांची संख्यादेखील कमी प्रमाणात आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास नकार देत आहेत. कोविड विशेष गाडय़ा सुरू असून, या गाडय़ांचे अगोदरच आरक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यांचे नियोजित प्रवास रद्द केले आहेत.

दररोज 200 तिकिटे रद्द केली जात आहेत. मागील दहा दिवसांत जवळपास दहा लाख रुपये तिकिटांचा परतावा प्रवाशांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट परतावा घेण्यासाठी आरक्षण खिडकीवर गर्दी करू नये. सर्व परतावा दिला जाईल. – प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक.