31 मेपूर्वी दहावी – बारावीचे निकाल लागणार, उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

दहावी, बारावीचे निकाल 31 मेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट दरवर्षीपेक्षा यंदा निकालाचे काम लवकर आटोक्यात आले असून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे दहावी आणि बारावी असे दोन्ही निकाल 31 मेपूर्वीच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तर दहावीच़ा निकाल जूनच्या पहिल्या, दुसऱया आठवडय़ात जाहीर करण्यात येतो. यंदा मात्र दोन्ही निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे.

आरटीई अंतर्गत शाळाप्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत देणार असल्याचेही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले. आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातून शाळा प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत उद्या, 30 एप्रिल रोजी संपणार आहे. आतापर्यंत उपलब्ध जागेच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात अर्ज आले आहेत. दरवर्षी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाते. 16 एप्रिलला प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आणखी मुदतवाढ दिली जाणार असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सुमारे 1 लाख 87 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाची गरज आहे, असे पालक अमुक एका शाळेचा, माध्यमाचा अट्टहास न धरता आपल्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश घेतील, असा विश्वासही गोसावी यांनी व्यक्त केला.

– राज्यातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा 20 मे रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात म्हणजेच 4 जूनपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या निकालाची प्रक्रिया मे महिन्यातच आटोपण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे.