
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू यू ललित यांनी शुक्रवारी त्यांच्याकडील सुनावणी न्यायालयाच्या ठरवलेल्या वेळेच्या एक तास आधी सुरू केली. त्यावरून सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत बोलताना ते न्यायालयात म्हणाले की ‘जर लहान लहान मुलं सकाळी सात वाजता शाळेत जाऊ शकतात तर मग न्यायमूर्ती व वकील नऊ वाजता कामकाजाला सुरुवात का करू शकत नाही?’
सर्वोच्च न्यायालयात कामकाजाची सुरुवात ही सकाळी साडे दहा वाजता होते. सकाळी साडे दहा ते चार वाजेपर्यंत न्यायालयात सुनावण्या होत असतात. यात दुपारी 1 ते 2 मध्ये लंच ब्रेक होतो. नेहमी साडे दहा वाजता सुरू होणाऱ्या न्यायालयात शुक्रवारी मात्र न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने साडे नऊच्या सुमारास केसच्या सुनावणीला सुरुवात केली. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. रविंद्र भट व न्यायमूर्ती सुधांशू धुलिया देखील होते.
न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या या निर्णयाची सुनावणीसाठी हजर असलेले देशाचे माजी अटॉर्नी जनरल व प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांनी कौतुक केले. ” न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचा हाच योग्य वेळ आहे.’ त्यावर प्रतिक्रीया देताना न्यायमूर्ती ललित म्हणाले की, ”खरंतर आपल्याला न्यायालयाचे कामकाज नऊ वाजताच सुरू करायला हवे. जर शाळेतील मुलं सात वाजता शाळेत जातात. तर आपण नऊ वाजता काम का नाही सुरू करू शकत’,




























































