
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबात शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दोन अर्ज आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिनिधी सभा आणि नेता निवड असे हे दोन अर्ज आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रात कमतरता असल्याचा युक्तीवादही ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी केला. शिंदे गट राजकीय पक्ष नाही असा युक्तीवाद त्यांनी यावेळी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने प्रतिनिधी सभा आणि नेता निवड करणे आवश्यक असल्याचं मत कपील सिब्बल यांनी आयोगासमोर मांडलं आहे. त्यासाठी शिवसेनेच्या घटनेची माहिती सिब्बल यांनी आयोगाला दिली आहे. शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असं शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणत आहे असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी केला आहे. शिंदे गटाला जर शिवसेनेची घटनाच मान्य नाही तर मग शिंदेंची निवड कशाचा आधारावर?, असा सवालही त्यांनी केला.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे. 28 जिल्हाप्रमुखांची प्रतीज्ञापत्रे नाहीत, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.
राष्ट्रीय कार्यकारणी ही आमच्यासोबत आहे, असंही त्यांनी आयोगापुढे सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड होऊ शकते असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रीय कार्यकारणीला वाढ द्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
ते गुवाहटीला निघून का गेले?
शिंदे गटातील सदस्यांनी लोकशाही मार्गानं आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. मात्र तसं न करता ते गुवाहटीला निघून का गेले? असा सवालही कपील सिब्बल यांनी उपस्थित केला. पक्षाने बोलवलेल्या सभेला उपस्थित का राहिले नाहीत? असेही ते म्हणाले.
शिंदे गट राजकीय पक्ष नाही!
आम्ही प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणी यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे पूर्ण केली आहे. मात्र शिंदे गटानं याबाबतीची कुठलीही पुर्तता केलेली नाही. तेव्हा तो केवळ गट आहे, राजकीय पक्ष नाही, असा जोरदार युक्तीवाद देखील त्यांनी यावेळी केला आहे.




























































