
नाटकाचे तिकीट दर जास्त असल्यामुळे सहकुटुंब नाटकाला जाणं हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन अभिनेते प्रशांत दामले यांनी चांगला निर्णय घेतला आहे.
त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर गडकरी रंगायतनमधील ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या दोन्ही नाटकांच्या बाल्कनीचा तिकिटाचा दर केवळ 100 रुपये ठेवला होता. नाटय़गृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी प्रशांत दामले यांचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून जवळपास 70 टक्के बाल्कनी प्रेक्षकांनी फुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले.
नुकतेच प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर नाटय़गृहाच्या बाल्कनीचा फोटो शेयर केला आहे. पोस्टमध्ये प्रेक्षकांचे आभार मानत त्यांनी म्हटलंय, ‘अनेक महिन्यांनी तुमच्यामुळे काल गडकरी रंगायतनची बाल्कनी उघडली आहे. जवळपास 70 टक्के बाल्कनी फुल्ल झाली होती. सगळ्यात आनंद म्हणजे बाल्कनीच्या पहिल्या रांगेत 2 मुलं पण आहेत.
मला त्यांच्या पालकांचा अभिमान वाटतो. तुमच्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. खूप धन्यवाद.’ तसेच आजपासून या दोन्ही नाटकाच्या मुंबई, ठाणे, वाशी, कल्याण आणि डोंबिवलीतील प्रयोगांचे बाल्कनीचे तिकीट 100 रुपये तर पुणे, चिंचवड आणि नाशिकमधील प्रयोगांचे बाल्कनीचे तिकीट 149 रुपये असणार आहे असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. यापूर्वी नाटकाच्या प्रयोगासाठी बाल्कनीचा तिकीट दर 300 रुपये आणि 200 रुपये होता.




























































