
उल्हासनगरातील शहाड रोडवर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकर रोगापेक्षा इलाज भयंकर ठरत आहेत. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल ११ स्पीड ब्रेकर उभारले आहेत. कोणतेही मापदंड नसलेल्या उंच स्पीड ब्रेकरमुळे गचके सहन करताना वाहनचालकांचे प्राण कंठाशी आले आहेत.
शहाड रोड हा उल्हासनगरमधील महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र शहाड ते बिर्ला गेट, सेंच्युरी रेयॉन ते बिर्ला मंदिर रोड आणि म्हारळ नाका या पाच मिनिटांच्या अंतरासाठी ११ स्पीड ब्रेकर तयार करताना कोणते मापदंड वापरले, असा वाहनचालकांचा प्रश्न आहे. त्यातच स्पीड ब्रेकरची उंची अधिक आहे. शिवाय झेब्रा पट्टेही नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
पोलिसांचे बांधकाम विभागाला निर्देश
स्पीड ब्रेकरवर स्पष्टपणे झेब्रा पट्टे मारण्याची तसेच वाहनचालकांना ते सहज दिसतील अशा पद्धतीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला दिले आहेत.


























































