एपीएम आंदोलनातील 20 आंदोलकांची तब्येत खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। उरण

येथील एपीएम टर्मिनल (मर्क्स ) मधील कमी केलेल्या 99 कंत्राटी कामगारांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी आणखी आठ कामगारांची तब्बेत खालावलेली आहे. या आठ दिवसात उपोषणामुळे तब्येत खालावणाऱ्यांची संख्या आता 20 वर पोहचली आहे. या 20 उपोषणकर्त्या कामगारांची तब्येत खालावल्यानंतरही कंपनीच्या व्यवस्थापनाकडूनही अद्याप आंदोलनाची दखल घेतली नसल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी (25) रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कुटुंबीयांसह विचारपूस करून कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.अशी माहिती हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सल्लागार ॲड.भार्गव पाटील यांनी दिली.

येथील एपीएम टर्मिनल (मर्क्स ) मधील कमी केलेल्या 99 कंत्राटी कामगारांनी पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी 19 आँक्टोंबर पासून आपल्या कुटुंबीयांसह उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे. घरी बसून उपासमारीने मरण्याऐवजी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच करो या मरो ची भूमिका घेत आंदोलन सुरु केले आहे. मात्र मागील आठ दिवसांच्या उपोषण दरम्यान एकूण २० उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे.त्यांना उपचारासाठी वाशीतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी रायगड जिल्ह्यचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. कामगारांनी तब्येतीची काळजी घेण्याचेही त्यांनी आवाहन करुन कुटुंबीयाची विचारपुसही केली. कामगारांचा प्रश्न मुख्य मंत्र्यांपर्यत पोहचविण्याचे आश्वासनही पालक मंत्र्यांनी दिले. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ,महेश बालदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 20 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही .त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी सल्लागार ॲड.भार्गव पाटील यांनी दिली.