
सहनायिका असू दे किंवा खलनायिका, वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झाले. कुलाबा येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. 60-70 च्या दशकात आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी इंडस्ट्रीतील या मराठमोळ्या चेहऱयाने साऱयांचे लक्ष वेधून घेतले. शंभरहून अधिक हिंदी- मराठी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यांच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जवळकर असे होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी सोलापुरात झाला होता. त्यांचे बालपण सुखवस्तू कुटुंबात गेले. त्यांचे वडील उद्योगपती होते. शशिकला यांना लहानपणापासून अभिनेत्री व्हायचे होते. ते त्यांचे स्वप्न होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. पुढे व्यवसायात दिवाळं निघाल्यानंतर त्यांचे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. त्यावेळी शशिकला सात-आठ वर्षांच्या होत्या. तिथे त्यांची गायिका नूरजहाँसोबत गाठ पडली. नूरजहाँ यांनी शशिकला यांना ‘झीनत’ या होम प्रोडक्शन सिनेमात काम दिले. त्यानंतर ‘जुगनू’ आणि अन्य काही चित्रपट त्यांच्या वाटय़ाला आले. तत्कालीन निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे शशिकला यांच्याकडे लक्ष गेले. 1953 साली शांताराम यांनी ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात त्यांना काम दिले. पुढे 1950 ते 80 च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट केले. शशिकला यांचा विवाह ओमप्रकाश सहगल यांच्याशी झाला होता.
शशिकला यांची संवाद फेकण्याची लकब, चेहऱयावरचे हावभाव यामुळे खलनायिकेची भूमिकेत त्या चपखल बसल्या. ‘आरती’, ‘गुमराह’, ‘फूल और पत्थर’ अशा चित्रपटांत त्यांनी खलनायिका रंगवली. ‘नौ दो ग्यारह’, ‘कानून’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ अशा कित्येक चित्रपटांत त्यांनी काम केले. पडद्यावर खाष्ट सासू त्यांनी गाजवली.
शशिकला यांना ‘आरती’ आणि ‘गुमराह’ चित्रपटांसाठी फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला होता. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना 2007 साली ‘पद्मश्री’ सन्मान बहाल करण्यात आला. याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारचा राज कपूर गौरव तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
मनःशांतीच्या शोधात…
शशिकला यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. संसारातील चटके, मनाप्रमाणे न मिळणाऱया भूमिका यामुळे दुःखी झालेल्या शशिकला पुढे मनःशांतीसाठी अध्यात्माकडे वळल्या. इगतपुरीच्या विपश्यना पेंद्रात त्यांनी प्रवेश केला. 80 च्या दशकात मदर तेरेसांच्या कार्याने प्रभावित होऊन मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये सेवा द्यायला सुरुवात केली. कुष्ठरुग्णांची सेवा करणे, फरशी पुसणे अशी पडेल ती कामे त्यांनी केली. जवळजवळ नऊ वर्षे त्यांना समाजसेवा केली. त्यानंतर पुन्हा एकदा त्या अभिनयाकडे वळल्या. चरित्र भूमिका त्यांनी साकारल्या.
मराठी चित्रपट गाजवले
शशिकला यांनी ‘पठ्ठे बापूराव’, ‘जागा भाडय़ाने देणे आहे’, ‘येरे माझ्या मागल्या’, ‘चाळीतील शेजारी’, ‘झालं गेलं विसरून जा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘सलामी’, ‘महानंदा’, ‘लेक चालली सासरला’, ‘धाकटी सून’ या मराठी चित्रपटांत काम केले.




























































