मैत्रीखातर! बिग बी यांनी ‘हा’ सिनेमा एक रुपयाही न घेता फक्त विक्रम गोखलेंच्या मैत्रीपोटी केला होता

‘एबी आणि सीडी’ या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन झळकले होते. ‘बिग बी’ यांनी हा सिनेमा फक्त विक्रम गोखले यांच्या मैत्रीपोटी केला होता. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी एक रुपयाही घेतला नव्हता. खुद्द विक्रम गोखले यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

‘‘अमिताभ बच्चन आणि मी, आम्ही दोघं एकमेकांना गेल्या 55 वर्षांपासून ओळखतो. आम्ही अनेक हिंदी चित्रपटांत एकत्र काम केलं. ‘एबी आणि सीडी’ हा अमिताभ यांचा पहिला मराठी सिनेमा आहे. हा चित्रपट त्यांनी फक्त माझ्यासाठी केला. ‘विक्रम, मैं यह तुम्हारे लिए कर रहा हूं!’ असं ते मला म्हणाले होते.’’ ‘एबी आणि सीडी’ या सिनेमात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते. अमिताभ यांनी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

या सिनेमाच्या निमित्ताने विक्रम गोखले अमिताभ यांच्याबद्दल भरभरून बोलले होते, ‘‘अमिताभ बच्चन अगदी चित्रपटासाठी लागणारे कपडे आपल्या घरून घेऊ आले होते. ‘आम्ही तुमच्याकडे कपडय़ांचे माप घेण्यासाठी कारागीर पाठवतोय’, असं मेकर्सनी कळवलं; पण अमिताभ यांनी त्यास नकार दिला. ‘चिंता करू नका, मी माझ्या वॉर्डरोबमधील कपडे घेऊन येतो’, असं त्यांनी नम्रपणे मेकर्सना सांगितलं. शूटिंगच्या दिवशी अमिताभ आपली व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले. व्हॅनमध्ये 20 कपडे ठेवलेले होते. चित्रपटात कोणते कपडे शोभून दिसतात, ते सांगा, असं ते मेकर्सना म्हणाले. अगदी या सिनेमाचं डबिंगही त्यांनी स्वतः केलं होतं.’’