महिलांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार, पांड्या-राहुलवर बंदीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये महिलांबाबत केले वादग्रस्त वक्तव्य अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलला भोवण्याची शक्यता आहे. दोघांवरही बीसीसीआयकडून काही सामन्यांच्या बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर दोन-दोन एकदिवसीय सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. आता हे प्रकरण बीसीसीआयच्या लीगल सेलकडे जाईल आणि त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. याआधी बुधवारी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर ट्वीट कर माफी मागितली होती. त्यानंतर दोघांनाही बीसीसाआयने नोटीस पाठवून 24 तासांत उत्तर देण्याची तंबी दिली होती.

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना ‘शोबंदी’, बीसीसीआयच्या नोटिशीनंतर हार्दिकची माफी

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या माफीनाम्यावर असहमती दर्शवत विनोद राय म्हणाले की, ‘हार्दिक पांड्याच्या स्पष्टीकरणाशी मी असहमत असून दोन्ही खेळाडूंवर दोन-दोन सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात यावी अशी शिफारस केली आहे. परंतु शासकीय समिती सदस्या डायना एडुल्जी यांनी हिरवा झेंडा दिला तरच यावर निर्णय होईल’, असेही राय यांनी स्पष्ट केले. तसेच डायना या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार असून या दोघांवर बंदी घालता येऊ शकते का याची चाचपणी करत आहेत. परंतु शोमध्ये खेळाडूंनी केलेली वक्तव्य वाईट आणि अस्विकारार्ह आहेत, असे माझे मत असल्याचे राय यांनी सांगितले.

… तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार
दरम्यान, 12 जानेवारीपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून जर त्यापूर्वी या प्रकरणावर निर्णय झाल्यास दोघेही या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.