दबाव असेलच, पण जोशही आहे! कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास

आम्ही हिंदुस्थानात खेळो किंवा परदेशात, दबाव हा असतोच, पण आता जोशही आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी सज्ज आहोत. आम्ही गेले चार महिने जोरदार तयारी केलीय. मी विक्रमांच्या बाबतीत कधीच विचार करत नाही. गेले तिन्ही वर्ल्ड कप यजमान जिंकलेत, पण आम्ही फक्त आमच्या सामन्यांवर लक्ष देत आहोत. आमचे लक्ष एकावेळी एका सामन्यावरच असते, असे विश्वासपूर्ण उद्गार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ‘कर्णधार दिन’ कार्यक्रमादरम्यान काढले.

उद्या, गुरुवारपासून क्रिकेटचे महायुद्ध हिंदुस्थानातील दहा मैदानांवर 46 दिवस खेळले जाणार आहे. त्याआधी आज वर्ल्ड कपच्या दहा कर्णधारांना एकत्रित आणून ‘कर्णधार दिना’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी सर्व कर्णधार उपस्थित होते. या कार्यक्रमात रोहितने सर्व कर्णधारांना आश्वासन दिले की, हिंदुस्थानात सर्वच संघांना प्रेम मिळेल. प्रत्येक संघ आपल्या संघाला आनंद देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप जिंकणे सर्वांचेच स्वप्न आहे.  प्रत्येक सामना हा प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत खेळला जाईल आणि क्रिकेटवर प्रेम करणारे हिंदुस्थानी चाहते सर्व संघांवर प्रेम करतील.

आम्ही घरीच खेळतोय – बाबर

हिंदुस्थानच्या आदरातिथ्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अक्षरशः भारावला. हिंदुस्थानात आमचे जोरदार स्वागत झाले. आम्हाला याची किंचितही कल्पना नव्हती. आम्ही सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद लुटतोय. आम्हाला वाटतच नाहीय की, आम्ही हिंदुस्थानात आहोत. आम्ही आमच्या पाकिस्तानातच खेळतोय, असे वाटतेय. आम्ही वर्ल्ड कपसाठी तयार आहोत. आमची गोलंदाजी आमची ताकद आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून आमचे अनेक खेळाडू एकत्रच खेळत आहेत. याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.