
वरळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात आज पोलिसांनी दडपशाही करीत मिरवणूक रोखल्याने प्रचंड गोंधळ उडाला. पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. विशेष म्हणजे मिरवणुकीसाठी परवानगी असताना पोलिसांनी अनुयायांना रोखल्याने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीत प्रतिवर्षाप्रमाणे 14 ते 16 एप्रिल या कालावधीत वरळी जांबोरी मैदानात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार आज पहिल्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास भीम अनुयायांसह सर्वधर्मीयांनी या उत्सवात सहभाग घेतला. मात्र यावेळी अचानक आलेल्या पोलिसांनी ‘डीजे’ लावल्याचे कारण देत उत्सव रोखण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे भीम अनुयायांनी प्रचंड संताप व्यक्त करीत पोलिसांचा निषेध केला. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यापासून पोलीस अनुयायी आणि भीमप्रेमींना का रोखत आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे पोलीस आयुक्तांसोबत बोलल्यानंतर परवानगी
उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी वरळीकरांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली, तरीदेखील पोलिसांनी दडपशाही करीत उत्सव बंद करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पोलीस देवेन भारती यांच्याशी पह्नवरून संवाद साधत स्थानिक पोलिसांमुळे उत्सवात निर्माण झालेला गोंधळ थांबवण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी तातडीने वरळी पोलिसांना आदेश देत उत्सव साजरा करण्यात अडथळा आणू नका, असे निर्देश दिले.
देशाला संविधान देणाऱया महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा हक्क आम्हाला नाही आहे का? जर महामानवाची जयंती साजरी नाही करायची तर कुणाची करायची? – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते




























































