
देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या काही दिवसनपूर्वीच झुरळांबाबतच्या वक्तव्यावर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. आता सरन्यायाधीशांनी बुधवारी एका प्रकरणाची सुनावणी करताना पुन्हा एकदा असेच एक विधान केले आहे. एका आरोपीचा जामीन याचिका फेटाळून लावताना सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, “तुम्ही लोक परजीवी आहात, तुमचे तुरुंगात राहणेच समाजासाठी हिताचे आहे.” एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सायबर गुन्हेगारीशी संबंधित एका प्रकरणातील आरोपीच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीशांनी आरोपीला जामीन देण्यास स्पष्ट नकार देत कठोर टिप्पणी केली. ते म्हणाले की, सायबर गुन्हेगार हे परजीवी आहेत, जे लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करतात आणि त्यांना पकडणेही कठीण असते. अशा गुन्हेगारांनी तुरुंगाच्या गजाआड राहण्यातच समाजाचे हित आहे.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, तुम्ही लोक परजीवी आहात, जे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करतात. सायबर गुन्हेगारांबाबत आपल्याला अत्यंत कठोर व्हावेच लागेल. तुम्ही लोक कोणत्याही एका राज्यापुरते मर्यादित राहत नाही. तामिळनाडूमध्ये एखाद्याची फसवणूक करता आणि तिथून थेट जम्मूमध्ये निघून जाता. समाजाचे भले याच गोष्टीत आहे की, तुमच्यासारखे लोक तुरुंगाच्या गजाआडच बंद राहावेत.

























































