
इराणसोबतच्या शांतता कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सध्याचा सामंजस्य करार अद्याप अंतिम झालेला नाही. जर त्यांना हा करार पसंत पडला नाही, तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारू शकते, अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे. G7 परिषदेत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान ते असे म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “इराणसोबतच्या चर्चेनंतर एक अत्यंत मजबूत करार तयार करण्यात आला आहे. मात्र याचे अंतिम स्वरूप काय असेल हे अद्याप कोणालाही पूर्णपणे माहीत नाही.” त्यांच्या दाव्यानुसार, बहुतांश लोक या करारावर खूश दिसत आहेत. या कराराचा पर्याय संपूर्ण जगात आर्थिक अस्थिरता आणि मंदी असू शकतो. काही लोकांना जगात मंदी पाहायची आहे, असेही ते म्हणाले. ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
जे लोक जगात मंदी पाहू इच्छितात ते मूर्ख आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले की, अशा लोकांना जागतिक अर्थव्यवस्था आणि स्थिरतेचे महत्त्व समजत नाही. ट्रम्प यांनी म्हणाले की, “नंबर एक, सामुद्रधुनी कधीही उघडणार नाही.” मात्र ते कोणत्या सागरी मार्गाबद्दल बोलत होते हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
याशिवाय अमेरिकेकडून इराणमध्ये ३०० अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली जाईल, या वृत्ताचेही ट्रम्प यांनी खंडन केले. अशा बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले. या कराराचा भाग म्हणून अमेरिका कोणत्याही प्रकारची ३०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार नाही. इराणसोबतच्या चर्चेची स्थिती स्पष्ट करताना ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला की, सध्याचा सामंजस्य करार अद्याप अंतिम झालेला नाही. जर अंतिम करार त्यांना आवडला नाही, तर अमेरिका पुन्हा युद्धाकडे वळू शकते आणि अशा परिस्थितीत लष्करी कारवाईचा पर्याय खुला असेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

























































