सरकारच्या देखरेखीखालीच पेपरफुटीचे जाळे वाढले, नीट प्रकरणी राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुल गांधी यांनी टेलिग्रामवर बंदी घालण्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा विचार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टेलिग्रामवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

“टेलिग्राम बंदी” हा पेपरफुटी रोखण्याचा सरकारचा नवा उपाय असल्याची टीका करत राहुल गांधी म्हणाले की, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे. लाखो विद्यार्थी अनेक वर्षांपासून टेलिग्रामवर अभ्यास करत असून नोट्स, टेस्ट सिरीज, चर्चा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी या माध्यमाचा वापर करतात. अशा विद्यार्थ्यांकडून ही सुविधा हिरावून घेणे हा पेपरफुटीवरील उपाय कसा ठरू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टेलिग्रामवर बंदी घालणे हा पेपरफुटी रोखण्यासाठी प्रभावी किंवा त्रुटीविरहित उपाय नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी याची जाणीव देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला तसेच पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांनाही असल्याचा दावा केला. टेलिग्रामनंतर सरकार व्हॉट्सॲपवरही बंदी घालणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

परीक्षांच्या दिवशी विद्यार्थ्यांची कठोर तपासणी केली जाईल, त्यांच्या खिशांची झडती घेतली जाईल, प्रश्नपत्रिका वायुसेनेच्या माध्यमातून पाठवल्या जातील, मात्र पेपरफुटीच्या मूळ कारणांवर कारवाई केली जाणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पेपरफुटीचे जाळे सरकारच्या देखरेखीखालीच वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकारामुळे देशातील युवकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले.

मोदी सरकारने दिखावा करण्याऐवजी पेपरफुटी माफियांवर थेट कारवाई करावी, विद्यार्थ्यांवर निर्बंध लादू नयेत, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा देशातील युवा आपला हक्क मिळवण्यासाठी पुढे येतील, असा इशाराही त्यांनी दिला.