मुंबईतील 29 लसीकरण केंद्रे बंद! सोमवारपर्यंत आणखी काही केंद्रे बंद होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला मुंबईत आणि राज्यात विक्रमी प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्राने केंद्राकडे मागितलेल्या लसींचा साठा वेळेत मिळालेला नाही. मुंबईला पुढील साठा सोमवार, 15 एप्रिलपर्यंत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे मुंबईत लसींच्या तुटवडय़ामुळे आज 25 खासगी, तर पालिकेच्या शीव, राजावाडी, शताब्दी आणि माहीम मॅटर्निटी ही चार लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली. साठा वेळेवर उपलब्ध न झाल्यास सोमवारपर्यंत आणखी काही लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा वापर राज्य सरकारच्या काही रुग्णालयांत आणि नंतर पालिकेच्या पाच रुग्णालयांत करायला सुरुवात झाली. मात्र मुंबईत कोव्हॅक्सिन घेणाऱयांची संख्या खूप कमी असली तरी या लसीच्या तुटवडय़ामुळे आता नव्याने लसीकरणासाठी येणाऱया व्यक्तीला ही लस न देता कोव्हिशिल्ड दिली जात आहे, तर कोव्हॅक्सिन लसीचा साठा केवळ दुसरा डोस घेणाऱया व्यक्तीला देण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तसे निर्देश सगळय़ाच लसीकरण केंद्रांना पालिकेने दिले आहेत, अशी माहिती नेस्को जम्बो सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

लसीसाठी पाठपुरावा सुरूच    

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. पालिकेने लसीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्र दिले आहे. लसीचा साठा  मिळावा यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरणासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे 49  लसीकरण केंद्रे तसेच 71 खासगी रुग्णालयांत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ही लसीकरण केंद्रे बंद

1) एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्सर 2) हबीब हॉस्पिटल  3) ब्रीच कॅन्डी 4) भाटिया रुग्णालय (ताडदेव)  5) बी डी पेटीट पारसी हॉस्पिटल 6) सेंट एलिझाबेथ रुग्णालय  7) लायन ताराचंद बाप्पा रुग्णालय 8) सूर्या रुग्णालय 9) क्रिटीकेअर रुग्णालय 10) लायन कर्तारसिंह रुग्णालय 11) आरोग्यनिधी रुग्णालय 12) लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालय 13) श्री बाबाजी सुपर स्पेशालिटी रुग्णालय 14) रिद्धी विनायक क्रिटीकलर केअर 15) संजीवनी रुग्णालय 16) थुंगा रुग्णालय 17) लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी 18) ऑस्कर रुग्णालय 19) कांदिवली हितवर्धक मंडळ 20) कोहिनूर रुग्णालय  21) सर्वोदय रुग्णालय 22) गोदरेज मेमोरिअल रुग्णालय 23) डॉ. मिनाज मल्टीस्पेशालिटी  24) डॉ. भाटिया रुग्णालय (भांडुप ), 25) फोर्टीज रुग्णालय

मुंबईत सध्या 120 लसीकरण केंद्रे असून त्यातून आतापर्यंत एकूण 15 लाख 61 हजार 420 जणांना लस देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या 33, राज्य सरकारच्या 16 तसेच खासगी रुग्णालयांत 71 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांतील 71 केंद्रांपैकी 25 केंद्रे बंद करण्यात आली आहेत, तर पालिकेची 4 लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

लसीकरण थांबण्याला केंद्र सरकार जबाबदार

मुंबईला लसीचा साठा कमी मिळाला असल्यामुळे आज दिवसभरात लसीकरण सुरू राहील, मात्र उद्यापासून त्याचा फटका अनेक लसीकरण केंद्रांना बसणार असून त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करावी लागणार आहेत. केंद्र सरकार जगाला लस वाटत सुटले आहे. अगदी पाकिस्तानलाही केंद्र सरकारने लस पाठवली आहे. मग महाराष्ट्राला पुरेसा साठा का पाठवला नाही? त्यामुळे लसीकरण थांबले तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबई आणि राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथक मुंबईत दाखल झाले असून आज वरिष्ठ पालिका अधिकाऱयांची चर्चा झाली.

ब्रेक  द चेन (गुरुवारची रुग्णसंख्या)

  • राज्य रुग्ण 56286 मृत्यू 376
  • मुंबई रुग्ण 8938 मृत्यू 25
  • ठाणे      2001
  • नाशिक  1799
  • पुणे       7054
  • संभाजीनगर     810
  • नागपूर  3439
  • नवी मुंबई 1056
  • डोंबिवली  1310
  • पनवेल  513