
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुडवडा भासत आहे. इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबरोबर लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी राज्यातील ऑक्सिजनचा साठा आता फक्त वैद्यकीय कारणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी थेट जिल्हाधिकाऱयांना त्यावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांतून हवाईमार्गे लष्कराच्या मदतीने ऑक्सिजन आणण्याची परवानगी पंतप्रधानांकडे मागितली आहे. त्यासोबत राज्यातदेखील तंत्रज्ञानाचा वापर करून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
हवेतील ऑक्सिजन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते साठवले जाणार आहे. हे ऑक्सिजनचे सिलिंडर रुग्णालयात देण्यात येणार आहे. एका कपाटाएवढे हे यंत्र आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अत्यंत सोयिस्कर, तसेच ते कमी खर्चिक आहे. शिवाय हव्या त्या ठिकाणी घेऊन जात उपयोगात आणता येणारे असे हे तंत्रज्ञान असल्याचे टोपे म्हणाले.
जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान राबवले जाणार आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी प्राण सोडणाऱया रुग्णांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली.
लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत 25 ते 100 खाटांच्या रुग्णालयासाठी ते वापरण्यात येईल. येत्या पंधरा दिवसांत मराठवाडय़ात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

































































