
>> डॉ. सरिता विनय भावे
सदाबहार आंबा महाराष्ट्राचा ‘राज्यवृक्ष’ असून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांचे ‘राष्ट्रीय फळ’ आहे. या डेरेदार वृक्षाची पाने आधी तांबूस कोवळी, हळूहळू जांभळी आणि नंतर हिरवीगार होतात. आकारात ‘कुयरी’शी साधर्म्य असलेल्या आंब्यात प्रजातीनुसार हिरवा, पिवळा, केशरी, जांभळा असे रंगवैविध्य आढळते.
वसंत ऋतू म्हणजे सृष्टीने कात टाकून सृजन आणि सर्जन वृद्धिंगत होण्याचा कालावधी. झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. आम्रमंजिरीचा मोहक फुलोरा आणि मादक घमघमाट चित्तवृत्ती प्रफुल्लित करत असतो (उगाच नाही कामदेवाच्या ‘मदन’बाणात आम्रमंजिरीचा समावेश आहे!). अशा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल, संस्कृत नाटककारांनी ‘वसंतसखा’ म्हणून नावाजलेल्या आम्रवृक्षाच्या गर्द पानांआड दडून, आपल्या मधुर कुजनाने देणारा कोकीळ, यांतील अद्वैत बहारदारच! ‘नाचरे मोरा आंब्याच्या वनात…’ या बालगीताने आंबा आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. नंतरच्या काळात… ‘निक्काल’ काहीही लागणार असला तरी एकदाच्या संपलेल्या परीक्षा, आतुरतेने वाट पाहत असलेली आणि आता दृष्टिक्षेपात असलेली उन्हाळ्याची सुट्टी, लग्न–मुंजीसारख्या कौटुंबिक/धार्मिक समारंभांचे शुभमुहूर्त, आप्तस्वकीयांची वर्दळ, आंब्याच्या पानांनी सुशोभित मंगल कलश, दारावरचे आंब्याच्या डहाळीचे प्रसन्न तोरण आणि आमरसाचे रसभरीत जेवण, असे आपले आंब्याशी ‘रसाळ’ समीकरण जुळते!
वनस्पतीशास्त्रात Mangifera indica असे नाव देऊन, त्याचे ‘मूळ’ हिंदुस्थानशी निगडित आहे, हे जगाने मान्य केले आहे. मोगल बादशहांनी आपल्या विलासी वृत्तीला अनुसरून आंब्याची रसिकतेने दखल घेऊन त्याच्या विविध प्रजातींचे नामकरण केल्याचे उल्लेख आहेत. सदाबहार आंबा महाराष्ट्राचा ‘राज्यवृक्ष’ असून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांचे ‘राष्ट्रीय फळ’ आहे. या डेरेदार वृक्षाची पाने आधी तांबूस कोवळी, हळूहळू जांभळी आणि नंतर हिरवीगार होतात. आकारात ‘कुयरी’शी साधर्म्य असलेल्या आंब्यात प्रजातीनुसार हिरवा, पिवळा, केशरी, जांभळा असे रंगवैविध्य आढळते.
आंब्याइतकेच कैरीचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे! चैत्रगौरीच्या पूजेत कैरीची डाळ आणि पन्हे हा नैवेद्य असतो. कैरीत अनेक क्षार आणि जीवनसत्वे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत अतिघामावाटे होणाऱया क्षारांच्या कमतरतेला भरून काढण्यासाठी कैरीचे पन्हे अमृतासमान आहे. लहानपणची तिखटमीठ लावून खाल्लेली कैरी! तिची नुसती आठवणही आता ‘चटकदार’ वाटते! कैरी/आंबा ‘रुचीवर्धक’ असल्याने हिंदुस्थानभर आमचूर, नानापरींचे मुरांबे, लोणची, पोळ्या करून वर्षभर त्यांचा आस्वाद तर घेतातच, नेहमीचे जेवणही अधिक चविष्ट करण्यात त्यांचा हातभार लागतो. गुजरात्यांचा चटकदार छुंदा, मध्य आणि उत्तर प्रदेशातील लोंजी, यांच्या नावानेच तोंडाला पाणी सुटते! ‘चांदीच्या वाटीतून प्यावा’ अशी आमरसाची महती असली तरी तो बाधू नये म्हणून त्यात काळ्या मिऱयाची पूड टाकणे श्रेयस्कर (इति सासूबाई!). आयुर्वेदानुसार केळी वगळता, फक्त आंबाच दुधाबरोबर घेतलेला चालतो. म्हणूनच श्रीखंड, लस्सी, आईस्क्रीम यांच्याबरोबर त्याची वर्णी लागते आणि त्या-त्या पदार्थाची लज्जत तो अजून वाढवतो. शीतपेयांच्या यादीतही आंबा अग्रगणी असून सहसा बाळगोपाळांत प्रिय असतो!
‘हापूसशिवाय आम्ही कश्शाकश्शाला हात लावत नाही’ अशी ‘कोकणच्या राजाची’ जगभर ख्याती असली तरी ‘पायरी’, ‘लंगडा’, ‘केशर’, ‘दशेरी’, ‘तोतापुरी’, गोव्याचा ‘मानकुराद’ यांचीही गोडी अद्वितीय आहे! लहानपणी आम्ही रायवळ आंब्यांची ‘नाके’ उडवून, त्यांना पिळून चोखायचो. नवीन पिढीला मात्र दुर्दैवाने यातील गंमत न कळताच ही प्रथा नामशेष होईल असे वाटते! आमराईची हद्द ओलांडून आंब्याने आपल्या आडनावांच्या, गावांच्या, घाटांच्या, खेळांच्या नावात येऊन जवळीक तर साधली आहेच पण ‘अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं…’ अशा लोकगीतांमध्येही तो आवर्जून येतो. ‘गेले आंब्याच्या वनी…’, ‘आंबा पिकतो रस गळतो…’ या मराठी गाण्यांबरोबरच हिंदीतही ‘कोयलिया’ला ‘अंबुवाकी डालिपे’ बसवून ‘बोलायला’ लावले आहे! सर्वव्यापी अशा या फळांच्या ‘सम्राटा’ला हिंदीत ‘आम’ म्हणत असले तरी आपल्यासाठी तो ‘खास’ आहे हे निःसंशय!
z [email protected]





























































