बारसू रिफायनरी सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; 17 पोलीस जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात प्रस्तावित असलेल्या राजापूर येथील रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरूवात होणार आहे. बारसू सोलगाव हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. आज रिफायनरीच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असल्याने माती परिक्षणासाठी ड्रिलिंग चालू असलेल्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याच रिफायनरी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला सकाळच्या सुमारास अपघात झाला असून 17 पोलीस जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाला मोठा विरोध होत असून गावकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी बारसू सोलगाव व आसपासच्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला सकाळी साडे नऊच्या सुमारास अपघात झाला.

पोलिसांची गाडी उलटून झालेल्या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना सुरुवातीला धारतळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पावस रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रोहित साळवी (वय – 30), किशोर साळवी (वय – 38), निलेश सोनवणे (वय – 33), प्रसाद सोनवणे (वय – 34), मनोज लिंगायत (वय – 35), उदय मोनले (वय – 28), हनुमंत नलावडे (वय – 52), आनंद देसाई (वय – 47), पंकज वदार (वय – 29), विजय आग्रे (वय- 32), अमोल गायकवाड (वय – 35), सुबोध मडगांवकर (वय – 35), विष्णू भोये (वय – 41), विजय कलगुटके (वय – 49), विलास घोगले (वय – 50), उमेश खाडेकर (वय – 35) आणि शिवम अंबोलकर (वय 27) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

जमावबंदी, नोटीस आणि अटक

दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बारसू सोलगाव परिसरात तहसीलदार शीतल जाधव यांनी 22 एप्रिल ते 31 मे 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. शिवाय मोठय़ा प्रमाणावर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली असून काहींच्या घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत. दिपक जोशी, अमोल बोळे, कमलाकर गुरव, सतीश बाणे, वैभव कोळवणकर, नितीन जठार यांना अटक करण्याचे ठरवले आहे.