
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी बॅनर लागत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केले आहे. जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील असे त्यांनी म्हटले. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन चेअरमन प्रतिक पाटील यांचा सत्कार खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. यावेळी संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी हे विधान केले.
जयंत पाटील याांनी महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवले आहे. आजही माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रातील सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहतो. त्यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, असे कोल्हे म्हणाले.
आमदार म्हणतात, कामाला लागा
दरम्यान, पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. अजित पवार हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य लंके यांनी याआधीही अनेकदा केले आहे. 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी आयती चालून आलेली असतानाही अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. याबाबत अजित पवारांनीही खंत बोलून दाखवली होती.
आताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करतो!
आगामी विधानसभा निवडणुकीत 2024ला मुख्यमंत्री पदावर क्लेम करणार का, या थेट प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2024ला कशाला? आताच मुख्यमंत्री पदावर क्लेम करायला तयार आहे, असे विधान केले. पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले, 2004मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. तेवढे संख्याबळ पक्षाकडे होते; परंतु काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. पक्षाची शिस्त पाळावी लागते. त्या वेळी पक्षाचे नेते म्हणून आर.आर. पाटील यांची निवड केली होती. संधी मिळाली असती तर ते मुख्यमंत्री झाले असते. मात्र आम्हाला संधी मिळाली नाही. 2024ला मुख्यमंत्री पदावर क्लेम करणार का, असा प्रश्न विचारताच 2024 कशाला? आताच मुख्यमंत्री पदावर क्लेम करतो, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
































































