
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी उद्या 14 एप्रिल रोजी लाखो भीम अनुयायांचा जनसागर लोटणार आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेने जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष, सीसी टीव्ही पॅमेरे, मेटल डिटेक्टर, स्वच्छता व्यवस्था, विद्युत रोषणाई अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त आजपासूनच तैनात ठेवला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे दरवर्षी लाखो अनुयायी महामानवाला वंदन करण्यासाठी येत असतात. कुटुंबकबिल्यासह अनुयायी अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावतात. अभिवादनासाठी असलेली ही रांग वरळीपर्यंत जात असल्याने अनुयायांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. यानुसार या वर्षीही पालिकेने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमी येथे भीम अनुयायांकरिता दुतर्फा रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
90 डॉक्टर, 5 अॅम्ब्युलन्स
भीम अनुयायांच्या आरोग्यासाठी 30 वैद्यकीय अधिकारी तैनात असतील. त्यांना सहाय्य करण्यासाठी 60 वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील. या ठिकाणी नेत्ररोग, स्त्राrरोग, बालरोग तपासणी केली जाईल. शिवाय मेडिसिन व सर्जरी विभागांसह 5 अॅम्ब्युलन्सही तैनात असतील. याशिवाय फिरती शौचालये, अग्निशमन दलाची व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणीदेखील उपलब्ध करून देता येईल.
पोलीस यंत्रणाही, समता सैनिक दल सज्ज
चैत्यभूमी येथे पोलिसांकडूनही तगडा बंदोबस्त शिवाजी पार्क परिसरात तैनात ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त, एसीपी, अधिकारी, कर्मचारी असा फौजफाटा सुरक्षेसाठी असणार आहे. समता सैनिक दलाचे जवानदेखील सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.


























































