‘शक्तिपीठ’मधून 70 हजार कोटींचा ‘ढपला’ पाडण्याचा सरकारचा डाव, अंतर वाढवून खर्च एक लाख कोटींवर पोहोचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रकल्पातून 70 हजार कोटींचा ‘ढपला’ पाडण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. महायुती सरकारच्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱयांचा विरोध आहे. त्यानंतरही सरकारने या महामार्गाचे अंतर वाढवले आहे आणि त्यामुळे हजारो कोटी अतिरिक्त खर्च होणार आहे. हा महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा आहे. कारण हा सर्व पैसा जनतेने व्याजासहित टोल रूपाने परत करायचा आहे, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी केल्या जाणाऱया भरमसाट खर्चाची आकडेवारीच मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग जाहीर करताना तो 802 किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यावर 86 हजार कोटी रुपये खर्च होईल असे सांगितले होते. म्हणजेच एक किलोमीटर रस्त्यासाठी 107 कोटी 23 लाख रुपये खर्च होता. आता हा महामार्ग माण-खटावमार्गे वाढवला गेला आहे. 54.94 किलोमीटर आणखी लांब केला जाणार आहे. त्यामुळे खर्चही एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला गेला आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ‘देवाभाऊ, फोंडया माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी 254 कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?’ असा सवाल करत शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

एक किलोमीटरला 254 कोटींचा खर्च, काय ट्रम्प तात्यांचे डॉलर्स रस्त्यावर ओतणार का?

अंतर वाढवल्यानंतर शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 14 हजार कोटी रुपयांनी वाढला. म्हणजेच माण-खटाव या माळरानावरून जाणाऱया एक किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 254.54 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. ट्रम्प तात्यांचा डालर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.