डगआऊटमध्ये मोबाईलचा गोंधळ, भिंडर अडचणीत; 24 तासांत उत्तर द्या, नाहीतर… एसीएसयूने कारवाईचा दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये नियमभंगाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंडर यांच्यावर कारवाईची तलवार लटकताना दिसतेय. डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचा आरोप त्यांच्यावर झाला असून बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाने (एसीएसयू) त्यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अवघ्या 24 तासांत स्पष्टीकरण द्या, असा कठोर आदेश देण्यात आला आहे.

गुवाहाटीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात भिंडर डगआऊटमध्ये मोबाईल वापरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. त्यावेळी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीही त्यांच्या शेजारी बसलेला दिसत होता. नियमांनुसार संघ व्यवस्थापक मोबाईल वापरू शकतात, मात्र डगआऊटमध्ये वापरण्यास बंदी आहे आणि इथेच भिंडर अडकले आहेत.

दरम्यान, काही सूत्रांनी त्यांच्या अलीकडील आरोग्य समस्यांचा मुद्दा पुढे करत फोन वापराचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असला तरी बीसीसीआयमधील अनेकांना हा युक्तिवाद पटलेला नाही. नियम म्हणजे नियम. त्यात कोणतीही सवलत नाही, अशीच भूमिका घेतली जात आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच भिंडर उप्पल स्टेडियमवरील सामन्यात दिसले, मात्र संशयाचे ढग अजूनही कायम आहेत. विशेष म्हणजे, ते वैभव सूर्यवंशीचे स्थानिक मार्गदर्शक मानले जातात, त्यामुळे या प्रकरणाला आणखी संवेदनशील वळण मिळाले आहे. आता भिंडर यांचे उत्तर काय येते, याकडे संपूर्ण हिंदुस्थान क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.