
शिवसेना कलिना विधानसभेच्या सहकार्याने सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून राबवत असलेल्या ‘मिशन दृष्टी’ या योजनेचे नामकरण आता ‘सुनयना पोतनीस नेत्र ज्योती अभियान’ असे करण्यात आले आहे. नुकताच या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत दरवर्षी 60 रुग्णांवर पूर्णपणे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनयना पोतनीस या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान आणि अवयवदान या कार्याची दखल घेऊन समाजाने त्यापासून प्रेरणा घ्यावी यासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून ‘मिशन दृष्टी’ ही योजना राबवली जात आहे. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे आज वाढत चाललेल्या दृष्टीदोषाचा विचार करून गरजू रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थेने योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत संस्थेने शेकडो शस्त्रक्रिया मोफत करून घेतल्या आहेत. या उपक्रमाचा अधिक मोठय़ा प्रमाणात विस्तार करण्याचा संकल्प शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी केला असून या अभियानांतर्गत दरवर्षी 60 रुग्णांवर पूर्णपणे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा संकल्प प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, वैद्यकीय, सांस्पृतिक, सामाजिक, ग्रामविकास, पर्यावरण, अंधश्रद्धा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. कोरोना काळात वैद्यकीय सुविधा, अतिवृष्टीग्रस्तांना वैद्यकीय व जीवनावश्यक साहित्याची मदत, उन्हाळय़ात दुर्गम भागांत पाणीपुरवठा, मनोरंजनासाठी सांस्पृतिक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञानावर आधारित कार्यक्रम, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.



























































