
कल्याणमध्ये पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून संतप्त माथेफिरू पित्याने पोटच्या अडीच वर्षांच्या लेकीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. आईने प्रसंगावधान दाखवत निर्दयी बापाच्या तावडीतून मुलीची सुटका करत तिला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. गळा चिरला गेल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी विलास दिनकर फरार असून कोळसेवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खडेगोळी परिसरात विलास दिनकर आणि लक्ष्मी दिनकर या पती – पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. पतीच्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी माहेरी मध्य प्रदेशात गेली होती. काही दिवसांपूर्वी विलासने तिथे जाऊन मुलगी अदितीला परस्पर आपल्या सोबत कल्याणला आणले. यानंतर लक्ष्मीने मध्य प्रदेश आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीकडून स्वतःला आणि मुलीच्या जीविताला धोका असल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी विलासला शोधून मुलीला आईच्या ताब्यात दिले.
त्यावेळी विलासने आपली चूक मान्य करत पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. त्याच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून लक्ष्मी मुलीसह पुन्हा कल्याणला राहायला आली. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणाचा राग विलासने चिमुकलीवर काढला. धारदार शस्त्राने अदितीच्या गळ्यावर वार केला. यावेळी लक्ष्मीने तत्काळ धाव घेत विलासच्या तावडीतून मुलीची सुटका केली.
सेंट्रल रुग्णालयाचा हलगर्जीपणा
गंभीर जखमा असूनही उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ क्रिम लावून मुलीला घरी पाठवल्याचा आरोप आई लक्ष्मीने केला. मुलीची प्रकृती अधिकच खालावत असल्याने तिने तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र प्रचंड खर्च सांगण्यात आल्याने अखेर मुलीला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

























































