
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके याचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. यात शेळकेची पत्नी आणि मुलगा जखमी गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरहून शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावाजवळ शेळकेच्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट करत शेळके याच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शेळके हा अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चा उपाध्यक्ष होता. तसेच खरातच्या काही व्यावसायिक हितसंबंधांशीही त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते. शेळके हा आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस त्याच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात शेळकेची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत पुढील तपास सध्या सुरू आहे.
शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2026




























































