
>> प्रदीप चंपानेरकर
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्देचि गौरव पुजा करू… असा लेखन परंपरेचा, संपन्नतेचा पुस्तकांचा ठेवा आपल्याला कल्पनेपलीकडचे आत्मिक समाधान देतो. म्हणूनच पुस्तकांच्या खुणा मनासोबतच घराच्या भिंतींवर, कोपऱयात असायला हव्यात. जीवनातल्या खऱया समृद्धीचा तो अनुभव ठरतो.
‘युनेस्को’ (UNESCO) या ‘युनो’च्या (युनायटेड नेशन्स अर्थात संयुक्त राष्ट्र संघटना) उपशाखेने 1995 साली 23 एप्रिल हा ‘आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन’ म्हणून (World Book Day) म्हणून जाहीर केला. जवळपास शंभराहून अधिक देशांत तो साजरा केला जातो. अर्थात भारतातही! आता 23 एप्रिलच का? तर त्यालाही साहित्य संदर्भ आहे. 23 एप्रिल हा जगप्रसिद्ध नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस. शेक्सपिअरचे महत्त्व काय? तर त्यांनी निर्माण केलेलं सर्वव्यापी, सर्वकालीन साहित्य. आज चारशे वर्षांनंतरही त्यांच्या नाटककांतून, काव्यांतून मानवी स्वभाव, मानवी मूल्यं याविषयी केलेलं भाष्य, केलेलं विश्लेषण, मांडलेले विचार आजच्या काळाशी सुसंगत ठरतात, सयुक्तिक ठरतात.
तीस वर्षांपूर्वी ‘पुस्तक दिन’ जगभर साजरा केला जावा, असं ‘युनेस्को’ला का वाटावं? त्यांच्या निरीक्षणात असं आढळून येत होतं की, भौतिकतेच्या आाढमणात दिवसेंदिवस माणसांमधलं पुस्तक प्रेम कमी कमी होत चाललंय. तेव्हा साक्षरतेचा प्रसार व्हावा, वाचनाच्या उपयुक्ततेविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि वाचन प्रेमाला प्रोत्साहन मिळावं असा एकंदरित त्यामागे उद्देश होता. विशेषत तरुण पिढीने पुस्तक वाचनाला आयुष्यात स्थान द्यावं, अशी तळमळीची इच्छा या पुस्तक दिनाच्या मागे होती. माणसाचं जीवन दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललंय. अशा पार्श्वभूमीवर पुस्तकांपासून माणूस दुरावत चालला आहे. अशा वातावरणात खरं म्हटलं तर पुस्तकांचं महत्त्व द्विगुणीत होतं, वाढतं. वास्तविक ‘युनेस्को’ची कार्यकक्षा व्यापक आहे. त्यांना पुस्तकांना इतकं महत्त्व का द्यावंसं वाटलं असावं? विचार करता जाणवतं की, पुस्तकं आपल्याला सर्वकाही देऊ शकतात. आज जीवनशैली झपाटय़ाने बदलत आहे, जगण्याच्या आवश्यकता वेगाने वाढत आहेत अशा काळी पुस्तकांची साथ मोलाची ठरते. कशी ते पाहू…
मराठी पुस्तकांच्या विश्वाचा विचार केला तर आज जाणवतं की, उपलब्धता भरपूर आहे. पुस्तक-लेखनातून विषय-वैविध्याचा विपुल प्रमाणात माग घेतला जात आहे. त्यात कथा, कादंबऱया, ललित अशा सर्जनशील लिखाणांचा मोठा समावेश आहे. चरित्र, आत्मचरित्रही बऱयापैकी प्रसिद्ध होत असतात. जोडीला अनुभवपर, आठवणीकेंद्री लिखाण करण्यासही बरीच जण प्रवृत्त होत आहेत. त्यांच्याबरोबर वैचारिक लिखाण, सामाजिक भावनेतून केलेलं लिखाण, राजकीय विश्लेषणात्मक लिखाण, असे सर्व विषय मिळून पुस्तकांचा परीघ वाढतोय. पुस्तकांची दुसरी शाखा म्हणावी अशी पुस्तकं म्हणजे रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी पुस्तकं. आपलं जीवन अधिक सुखकर करणारी. इतकंच नव्हे, तर जगण्याला विविध पैलू जोडले जावेत, ते अधिक समृद्ध होत रहावं यासाठीही मोठय़ा प्रमाणात लिखाण होत आहे आणि त्याची पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत. अशी विविध विषयांवरील पुस्तकं आपल्या जीवनाला कशा प्रकारे आकार देऊ शकतात ते पाहू…
कथा, कादंबऱया जास्त करून लिहिल्या जातात त्या स्व-अनुभवांवरून आणि एकंदर समाजाच्या निरीक्षणांतून. त्या प्रसंगांना, घटनांना, अनुभूतींना कल्पनांविलासाची जोड देऊन त्यांची एकमेकांत गुंफण करून त्यातून एक सर्जनशील निर्मिती केली जाते. अशा पुस्तकांच्या वाचनातून वाचकांना आपल्या अनुभवांकडे, नात्यांच्या विणींकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळू शकते. त्याला समाजातील विविध स्वभाव-प्रकृतींची, प्रवृत्तींची ओळख होत जाते. त्यांचं स्वकेंद्रिपण कमी होऊ शकतं. लेखनातील ललितबंध प्रकारातूनही वाचक अनुभवसंपन्न होतो. त्याचं विश्व विस्तारू शकतं. नाही म्हटलं तरी आपल्या दैनंदिन जीवनाच्या रेटय़ातून आपण कितीसं जग पाहू-अनुभवू शकतो? कितीसं सांस्कृतिक जीवन जगू शकतो? इच्छा असली तरी वेळ आणि खर्च लक्षात घेता बाहेरचं जग अनुभवण्याला मर्यादा पडतात, परंतु ललित लेखनाच्या वाचनातून आपलं विश्व विस्तारतं.
ज्यांनी आपल्या कार्य-कर्तृत्वातून समाजात मोठं स्थान मिळवलं आहे, मोठी कर्तबगारी साध्य केली आहे, काही लक्षवेधी घडवलं आहे, त्यांच्या जीवनचरित्रांतून आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या चढ-उतारांचं, आशा-आकांक्षांचं, यशोपयशाचं, त्याच्यातील धडाडीचं जिवंत चित्रण अनुभवता येतं. त्यातून आपण धडे घेतो, शिकतो, समृद्ध होतो. त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. आपलं ध्येय काय हे आपण ठरवू शकतो आणि ते ध्येय गाठण्यासाठी वाचनातून मार्गही सापडू शकतो.
सामाजिक विषयांवरील पुस्तकांतून आपलं समाजभान वाढू शकतं. आपल्यातील एकेरीपणा जाऊन आपण उदारमतवादी होऊ शकतो, ज्याची आपल्याला नितांत गरज आहे. समाज समंजस, प्रागतिक विचारांचा झाला तरच एक समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो.
आता साहित्याच्या दुसऱया शाखेकडे पाहू या. व्यक्तिमत्त्व विकास, करीअर मार्गदर्शन, आरोग्य तसेच रहस्यकथा, गुप्तहेर कथा यांसारखी मनोरंजन करणारी पुस्तकंही आपलं मन चांगल्या प्रकारे रिझवू शकतात. आता राहता राहिला महत्त्वाचा विषय म्हणजे बालसाहित्य. हा तर कुटुंबातला महत्त्वाचा विषय व्हायला हवा. टीव्ही, मोबाईलचा घरात सुळसुळाट असताना मुलांना पुस्तक वाचनाची आवड लावण्याची आज नितांत गरज आहे. कोणतंही पुस्तक असू द्या… गोष्टीचं, चरित्रांचं, विज्ञानाचं, मनोरंजानाचं… कोणतंही. ती पुस्तकं आपल्या मुलांना अधिक सुसंस्कृत करतील एवढं निश्चित!
आज भौतिक-ऐहिक सुखाच्या कल्पना फोफावत आहेत. माणसं भौतिक सुखाच्या उपकरणांचा हव्यास धरताना दिसत आहेत. कधी त्या गोष्टी गरजेच्या असतात तर कधी उपभोगाच्या. काही हरकत नाही. काळाबरोबर जीवनमान, जीवनाच्या व्याख्या बदलणारंच. परंतु पुस्तक दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की, त्या भौतिकतेच्या जोडीला मनाच्या आणि घराच्या एका कोपऱयात छोटसं का असेना, पण पुस्तकांच्या कपाटाला… ‘बुक-केस’ला जागा असू द्या. पाहा जीवन खऱया अर्थाने समृद्ध होईल.
(लेखक ‘रोहन प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे संचालक आहेत.)



























































