अभिप्राय – संतचरित्राचा मागोवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आकाश भोरडे

संत साहित्याच्या परंपरेत ‘ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस’ इथपर्यंत सर्व संतांचा समावेश होतो. या संतांनी जे साहित्य निर्माण केले, त्यातील एका ओळीचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी अनेक वर्षे जातात. त्यामुळे या सर्व संतांना एकत्र आणणे म्हणजे खूप मोठी व अवघड गोष्ट आहे, परंतु मराठी साहित्यातील तब्बल पंचावन्न संतांना एकत्र आणण्याचे हे अवघड धनुष्य मनीषा मिसाळ-लोखंडे यांनी लीलया पेलले आहे.

‘संतांचियां गावीं प्रेमाचा सुकाळ’ हा कवितासंग्रह वाचत असताना संत साहित्यातील एकूण पंचावन्न ज्ञात अज्ञात संतांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. या कविता संग्रहातील पहिली कविता ‘संतांचियां गावीं प्रेमाचा सुकाळ’ आणि शेवटची ‘संतांच्या ओव्या’ या दोन कविता सोडल्या तर इतर सर्व कवितांची नावे ही संतांच्या नावावरून असल्याचे पाहायला मिळते. कविता संग्रहाचे शीर्षक असणाऱ्या पहिल्याच कवितेत कवयित्री मनिषा मिसाळ-लोखंडे कविता संग्रहाचे संपूर्ण सार सांगताना लिहिते की,
माय महाराष्ट्र भूमी साऱ्या संतांनी सजली
बाग महान कार्याची विठू सेवेत फुलली

कविता संग्रहातील या कवितेनंतर असलेल्या सर्व कविता या सर्वसाधारणपणे सात ते आठ कडव्यांमध्ये असून प्रत्येक कवितेत संतांच्या संपूर्ण कार्याचा व जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न कवयित्रीने केला आहे. ‘संत ज्ञानेश्वर’ या कवितेत संत ज्ञानेश्वरांचे कार्य सांगताना कवयित्री लिहिते की,

ओव्या आणि हरिपाठ मोठी वैकुंठाची वाट
ज्ञान ‘भावार्थदीपिका’ जागृतीची वहिवाट
धून अठरा योगांची ‘ज्ञानेश्वरी’ गाभाऱ्यात
नऊ हजार ओव्यांत गर्भ पेरले साऱ्यात

स्त्री संत साहित्यिका संत कान्होपात्रा यांच्या विषयी लिहिताना कवयित्री लिहिते की,

शामा नायकिणी पोटी, संतरत्न उगवले
विठुरायाच्या चरणी देहभान हरपले

अशा प्रकारे सुपरिचित संतांसोबतच संत तुकाराम महाराज यांची मुलगी मात्र वारकरी संप्रदायाला आजही कमी प्रमाणात परिचित असलेली संत भागुबाई म्हणजेच

भागीरथीविषयी लिहिताना कवयित्री लिहिते,
तुकोबाच्या काळजाची, लेक भागीरथी ठोका
माय जिजाबाई मनी झुले आनंदाचा झोका
पती मालोजी नावाचं कुंकू शोभतसे भाळी
अजूनही येती तिज माहेरची साडीचोळी
तर, आजही लग्न समारंभात ज्यांचे ढवळे गायले जातात आणि मराठी भाषेत पहिली कविता लिहिणारी स्त्राr कवयित्री होऊन गेली तिचे नाव संत महदंबा.तिच्याविषयी लिहिताना,
संत महदंबा थोर, जन्म रामसगावात
माय थोर संन्यासिणी महानुभाव पंथात
ग्रंथ ‘मातृका’ लिहिला, गोड ‘ढवळे’ रचली
थोर ‘संत महदंबा’ मनी जनाच्या साचली
त्याचप्रमाणे, संत शेख महमद, संत नरसी महाराज, संत बंका, संत निळोबा, संत कूर्मदास, संत भानुदास महाराज, संत नरहरी सोनार, संत तुकाराम महाराजांचे शिष्य असलेले संत अनगडशाह बाबा अशा पंचावन्न संतांचा जीवन परिचय कवितेतून करून देण्याचा प्रयत्न कवयित्री मनीषा मिसाळ-लोखंडे यांनी केला आहे. मराठी साहित्य विश्वात तो प्रथमच झाला असावा. कविता संग्रहाच्या शेवटी सर्व संतांची छप्पन पदांची ओवी लिहण्याचा एक वेगळा प्रयोगदेखील कवयित्रीने केला आहे. ‘संतांचियां गावीं प्रेमाचा सुकाळ’ हा केवळ कविता संग्रह नसून मराठी साहित्यातील काव्यग्रंथ असल्याची जाणीव वाचकाला होते.

संतांचियां गावीं प्रेमाचा सुकाळ
कवयित्री : मनीषा मिसाळ-लोखंडे
प्रकाशक : परीस पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : 88
किंमत : 200 रुपये