
दक्षिण दिल्लीतील अलकनंदा परिसरातील ‘तारा अपार्टमेंट’मध्ये शुक्रवारी रात्री एक थरारक घटना घडली. पैशांच्या वादातून एका शेजाऱ्याने पिता-पुत्रावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली. राकेश सूद (62) आणि त्यांचा मुलगा करण सूद (27) अशी मृतांची नावे असून, या हल्ल्यात त्यांचा राहुल नावाचा नातेवाईक देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, असद असे आरोपीचे नाव आहे. मालमत्तेच्या व्यवहारावरून शुक्रवारी सकाळी असदचे राकेश यांचा मुलगा करणसोबत भांडण झाले होते. याच रागातून रात्री साडे नऊच्या सुमारास असद पूर्ण तयारीनिशी सूद यांच्या घरी पोहोचला. तिथे पुन्हा वाद सुरू झाला आणि रागाच्या भरात असदने मोठ्या चाकूने करणवर वार करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वडील राकेश मध्ये पडले असता, आरोपीने त्यांच्यावरही गंभीर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमी पिता-पुत्राला तातडीने मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी असदला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासानुसार, असदने केलेला हा हल्ला पूर्णपणे नियोजित होता. त्याने मृतांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर वर्मी घाव घातले होते.
राकेश आणि करण सूद यांचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा (Property Business) व्यवसाय होता आणि आरोपीसोबत त्यांचे आर्थिक मतभेद होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शेजाऱ्यानेच अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे.



























































