
दोन तृतीयांश बहुमताअभावी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यामुळे मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. या पराभवामुळे निराश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर आगपाखड केली. ‘विरोधकांना त्यांच्या पापाची शिक्षा भोगावी लागेल,’ असे मोदी म्हणाले.
देशाला उद्देशून केलेल्या अर्ध्या तासाच्या भाषणात मोदींनी फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका केली. काँग्रेस, द्रमुक, सपा आणि तृणमूल काँग्रेसला त्यांनी प्रामुख्याने लक्ष्य केले. ‘हे विधेयक मंजूर झाले असते तर तामीळनाडू आणि पश्चिम बंगालला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या असत्या. मी स्वतः सर्व विरोधी पक्षांना पाठिंब्याचे आवाहन केले होते. श्रेय देण्याची तयारीही दाखवली होती. मात्र, त्यांनी ही संधी घालवली, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस सुधारणाविरोधी…
‘काँग्रेस हा सुधारणाविरोधी पक्ष आहे. सुधारणांचे नाव काढले की काँग्रेस त्याला विरोध करण्यासाठी पूर्ण ताकद लावते. खोटे नरेटिव्ह पसरवणे आणि गोंधळ उडवून देणे हा एकच त्या पक्षाचा अजेंडा आहे. प्रादेशिक पक्ष वाढू नये हा काँग्रेसचा हेतू आहे,’ अशी टीका मोदींनी केली.






























































