आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक, राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांनी लढा सुरू ठेवावा.जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालावा,मोर्चा काढावा किंवा रस्ता रोको करा.तुमच्या जिल्ह्यात रान पेटवा. त्यानंतर सर्वात शेवटी आरपारची लढाई आपल्याला लढायची आहे.दि.१५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आपल्याला धडक द्यायची आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रत्नागिरीतील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित आंबा-काजू बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात बोलत होते.

कोकण हापूस उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी आणि रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी हा आंबा-काजू शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात पुढे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या ५० वर्षात कोकणातील शेतकऱ्यांने सरकारकडे काहीच मागितले नव्हते मात्र आज शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे सरकारने त्याला मदत केली पाहिजे.निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे.हवामानातील बदलामुळे १० टक्केच आंबा उत्पादन आले आहे.त्या १० टक्के उत्पादनात खर्चाची विभागणी केली तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.अशावेळी सरकारने बागायतदारांना मदत केली पाहिजे.सरकारने प्रति कलम २२० रूपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.आज आंबा बागेत काम करणारा नेपाळीही दिवसाला जेवणखाणं करून ८०० रूपये घेतो आणि सरकार एका कलमाला फक्त २२० रुपये देत असल्याची खतं बोलून दाखवली.आज आंबा निर्यातीतून देशाला ७०० कोटी रुपयांचे परकीय चलन आणि आंब्यापासून बनवलेले विविध पदार्थ निर्यातीतून ६०० कोटी रुपयांचे परकीय चलन सरकारला मिळते.वर्षाला १३०० कोटी रुपयांचे परकीय चलन देणाऱ्या आंब्याला मदतीकरिता सरकार पाच हजार कोटी रुपये का देऊ शकत नाही? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

व्यापाऱ्यांनी व्याज घेतले तर दणका देऊ

जे व्यापारी बागायतदारांना पैसे देतात त्याच्यावर व्याज घेऊ नये कारण सावकारी बंद आहे.जर कोण व्याज घेताना दिसला तर दणका देऊ असा इशारा त्यांनी दिला.कीटकनाशक औषधांच्या कंपन्यांनी उधारीवर औषधे दिली आहेत त्यांनी टप्प्याटप्प्याने वसुली करावी.थोडी थकबाकी पुढील वर्षी वसूल करावी अशी विनंती शेट्टी यांनी केली.

कोकण परप्रांतीयांच्या घशात घातले जात आहे-विनायक राऊत

आज कोकणातील जमिनी दिल्लीतील परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात आहेत.कोकण गिळंकृत केला जात आहे.दिल्लीतील एका नामांकित व्यक्तीने सिंधुदुर्गात २५० एकर जमीन खरेदी करून बागायती केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी आजच्या मेळाव्यात केला.आंब्याचे एक कलम दहा हजार रुपये उत्पन्न देते त्या कलमाला सरकार २२० रूपयांची मदत जाहीर करते हे दुर्दैवी आहे.आज काजूला महाराष्ट्रात भाव मिळत नाही.पण तोच काजू सिंधुदुर्गची सीमा ओलांडून गोव्यात गेला की चांगला भाव मिळतो.कारण गोवा सरकारने काजूला हमी भाव दिला आहे.पण जिथे उत्कृष्ट काजू पिकतो ते सरकार काजूकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.आज खेड तालुक्यात लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी आणण्याचे पाप राज्य सरकारने केले आहे.लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीमुळे आज खेड उध्वस्त झाला आहे.कंपनीचे सांडपाणी नदीत मिसळल्याने मासे गायब झाले आहेत असा आरोप राऊत यांनी केला.

चिंटू-पिंटूनी सुरू केलेली रो-रो सेवा १७ दिवसात बंद

कोकणचा विकास आपणच करतोय हे दाखवण्यासाठी चिंटू-पिंटूनी सुरू केलेली रो-रो सेवा १७ दिवसात बंद पडली.रो-रो सेवेचे तिकिट नऊ हजार रुपये.त्यात गाडी असेल तर आणखी सहा हजार.अरे कशाला हवी रो-रो सेवा त्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्ग पुर्ण करा पाच तासात चाकरमानी मुंबईत पोहोचतील असा चिमटा माजी खासदार विनायक राऊत यांनी काढला.

रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी आपण स्वता तिसऱ्या पिढीतील आंबा बागायतदार आहोत.आम्हीही नुकसानीला सामोरे जात आहोत.आज कोकणातील शेतकऱ्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळ सुरू केली आहे या चळवळीला दिशा देण्याचे काम आजच्या मेळाव्यात होणार आहे. गेल्या सहा दिवसांत दोन हजार शेतकऱ्यांच्या घरी गेलो.त्यातील १ हजार ९९९ शेतकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आज ते सर्व शेतकरी उपस्थित नसले तरी त्यांनी यालढ्याला लेखी पाठिंबा दिला आहे असे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुख दत्ता कदम,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक नेहा माने,युवासेना राज्य सचिव प्रदुम्न माने,कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, स्वस्तिक पाटील, राजन डंगरवार, गणेश गावकर आणि डोके उपस्थित होते.यावेळी प्रकाश साळवी यांनी गेली १५ वर्षे आम्ही आंबा बागायतदार लढा देत आहोत पण कुणीही आमच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.