
वरळी येथील जलतरण तलावाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ असे करण्यास मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये हा जलतरण तलाव बांधण्यात आला होता.
वरळी जलाशय येथे लाल बहादूर शास्त्राr उद्यानाच्या बाजूला हा जलतरण तलाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वरळीतील युवासेना उपविभाग अधिकारी व वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रयत्नाने आणि तत्कालीन नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या सहकार्याने महानगरपालिकेकडून हा जलतरण तलाव बांधण्यात आला.
अभिजित पाटील तसेच युवासेना विभाग अधिकारी व महोत्सव समितीच्या सरचिटणीस आकर्षिका पाटील यांनी या जलतरण तलावाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली होती. वरळीसारख्या गिरणगावातील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनाप्रमुख नेहमीच अग्रेसर होते. वरळी सी लिंकही त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला. शिवसेनाप्रमुखांचे नाव आणि कार्य कायम स्मरणात रहावे म्हणून या जलतरण तलावाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. अखेर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.




























































