
आपल्या भोंदूगिरीच्या कारनाम्यांनी अनेकांचे डोके सून्न करणाऱ्या अशोक खरातला सहज बरा न होणारा डोकेदुखीचा आजार जडल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. न्यूरोसर्जनकडून उपचार करण्याची मागणी न्यायालयात केली, यामुळे तो यापुढील चौकशीला प्रतिसाद देईल का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिलांना गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याच्या पाचव्या गुन्ह्यात रविवारी खरातला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. कोणत्या द्रव्याचा वापर करून हा कट रचला आहे, याचा संपूर्ण तपास करण्यासाठी पोलीस कोठडी हवी, ही सरकारी वकिलांची मागणी न्यायालयाने मान्य केली, 23 एप्रिलपर्यंत कोठडी दिली. प्रत्येक गुन्ह्यात तपास यंत्रणेकडून तेच तेच मुद्दे मांडले जात आहेत, सर्व चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयीन कोठडी द्यावी, ही खरातच्या वकिलांची मागणी न्यायालयाने फेटाळली. बचावासाठी वकिलांनी त्याच्या प्रकृतीचे कारण पुढे केले, अर्धांगवायूमुळे खांद्याचे ऑपरेशन झालेले आहे, खांदेदुखी खूप वाढली आहे. खरातची डोकेदुखी तर थांबायला तयार नाही. पेनकिलर व इतर औषधे घेऊनही त्याचे डोके दुखणे थांबत नाही. न्यूरोसर्जनकडून त्याच्यावर उपचारासाठी परवानगी द्यावी, तेथेच त्याच्यावर उपचार व्हावेत, अशी मागणी वकिलांनी केली. यामुळे सर्वच चक्रावून गेले आहेत. डोकेदुखीचे कारण पुढे करून खरात पुढील चौकशीस असहकार्य करण्याची शक्यता आहे.

























































