
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणाची सुनावणी करणाऱया उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या खटल्यातून बाजूला होण्यास नकार दिला. तशी मागणी करणारा अरविंद केजरीवाल व अन्य आरोपींचा अर्ज त्यांनी आज फेटाळला.
स्वर्णकांता शर्मा यांनी या खटल्यातून बाजूला व्हावे अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच केली होती. स्वर्णकांता यांच्याच खंडपीठापुढे त्यांनी हा युक्तिवाद केला होता. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्यक्रमाला जाणाऱया न्यायमूर्ती मला न्याय कसा देणार? न्यायमूर्ती ज्या संघटनेच्या कार्यक्रमाला जातात, त्यांच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. असे असताना आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करणार, असे म्हणणे केजरीवाल यांनी मांडले होते.
अधिवक्ता परिषदेचा कार्यक्रम राजकीय नव्हता!
‘न्यायाधीश घाबरून आणि सोशल मीडियातील मोहिमांना बळी पडून खटले सोडायला लागले तर न्यायाचे मंदिर कोसळून पडेल, असे स्वर्णकांता म्हणाल्या. अधिवक्ता परिषदेचा कार्यक्रम राजकीय नव्हता. केजरीवाल यांनी केवळ निवडक उदाहरणे सांगितली. मी रुग्णालयांच्या कार्यक्रमातही जात असते, असेही त्यांनी नमूद केले.































































