शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का? कांदा प्रश्नी रोहित पवार यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करून सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला असला, तरी शेतकऱ्यांचा लढा थांबणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

रोहित पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?

आम्हाला आज अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३ रुपये वाढवले आणि आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन मुंबईपासून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्या बैठका होणार आहेत, हे शेतकरी एकजुटीचे यश आहे, असे रोहित पवार म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नसून उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली लढाई तीव्र करतील आणि ते मात्र या सरकारला परवडणारे नसेल, हे या सरकारने ध्यानात घ्यावे, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.