
‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहा यांना वाचवले. पण त्यांनी दगा दिला. शिवसेनेचे तुकडे केले. तुम्ही जो घात केला तो तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक तुमचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असे नमूद करताना मोदी-शहांचा काळ संपत आला आहे,’ असा हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. ‘तुम्ही सत्तेवर अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. 12 वर्षे सत्तेत आहात, पण परत सत्तेमध्ये येणार नाहीत,’ असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
अहिल्यानगर जिह्यातील शिवसेनेचा भव्य मेळावा आज शिर्डी येथे झाला. यावेळी संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. मोदी आणि शहा यांच्याप्रमाणे भाजपचा सुद्धा काळ संपत चालला आहे. या मोदी आणि शहांना सरळ मार्गाने कुठे जिंकता आले नाही. दुसऱयाचे पक्ष पह्डायचे, आयोगाला बरोबर घ्यायचे, न्यायालय खिशात ठेवायचे आणि मत विकत घ्यायचे, हेच यांचे धोरण आहे,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी समाचार घेतला.
‘‘एसआरआय’च्या माध्यमातून या भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक ताब्यात घेतली. आता आपल्याला सावध राहायचे आहे. पुढील वर्ष शिवसेना पक्षबांधणीसाठी आपल्याला सगळ्यांना झटायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख-आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते, समन्वयक प्रवीण महाले, अहिल्यानगर उत्तर जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी, नाना बावके, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, रावजी नांगरे, महानगरप्रमुख किरण काळे उपस्थित होते.
‘लाडकी बहीण’ योजनेत 17 हजार 540 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल करा
‘राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘लाडकी बहीण’ योजनेत 17 हजार 540 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, एक कोटीहून अधिक लाभार्थी महिला अपात्र ठरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिवंगत अजित पवार यांच्या पक्षावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत,’ अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. हा जनतेचा पैसा होता. तो निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणूकही रद्द करावी, असेही ते म्हणाले.
नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आज दादर येथे भव्य ‘युवा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी आयोजित केलेल्या या मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केले.































































