
सुनील उंबरे, पंढरपूर
सुमारे दोन लाख स्थानिक लोकसंख्या, दररोज दर्शनासाठी होणारी लाखोंची गर्दी, श्री विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था, शहरातील वाहतूक व्यवस्था, दर्शन व्यवस्था, व्हीआयपी बंदोबस्त आदी सांभाळता सांभाळता पंढरपूर पोलिसांचे कंबरडे मोडत आहे. अहोरात्र काम करुन देखील ना भाविक खुश आहेत ना स्थानिक नागरिक, हे सगळं घडते आहे केवळ पोलिसांच्या अपुऱ्या संख्या बळामुळे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे कायदा व सुव्यवस्था विठ्ठल भरोश्यावर सुरु आहे.
पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थस्थळ असल्याने, राज्याच्या गृह विभागाने विशेष बाब म्हणून अधिकचे पोलीस बळ देणे अपेक्षित आहे. अधिकचे संख्याबळ दूरच मंजूर असलेल्या संख्या बळाला मोठी कात्री लावल्याने, अल्प कर्मचाऱ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था पाहताना कर्तव्याला असलेल्या पोलिसांची दमछाक होते आहे.
सद्या अधिक मास सुरु आहे अधिक मासात चंद्रभागेचे स्नान आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. या पर्वणीचा आनंद घेण्यासाठी दररोज तीन ते पाच लाख भाविकांची उपस्थिती आहे.
पंढरपूरची स्थानिक लोकसंख्या आणि त्यात बाहेरुन येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्याची हजारो वाहने यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. देवाची दर्शनाची रांग गोपाळपूर पर्यंत गेली असल्याने, रांगेतील घुसखोरी, भाविकांची बाचाबाची यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांच्या हाताबाहेरचे झाले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची व्याप्ती व भाविकांची वर्दळ पाहता इथे किमान पाचशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अपेक्षित आहेत.
मात्र पंढरपूर शहर ठाण्याला 178 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मंजूर आहेत. त्यापैकी फक्त 124 उपलब्ध करुन दिले आहेत. 124 मध्ये साप्ताहिक सुट्टी, रजेवर गेलेल्यांची संख्या पाहिली तर 100 कर्मचारी आणि तीन चार अधिकाऱ्यांवर पंढरीच्या कायदा व्यवस्थेचा भार आहे.
भाविकांची वर्दळ, श्री विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक लोकसंख्या लक्षात घेऊन पंढरपूरसाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी करुन स्थानिक लोकप्रतिनिधी थकले. मात्र गृह खात्याला काही केल्याने, या विषयाचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. काही दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी गृह विभागाने वेळीच वाढीव पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देण्याची आवश्यकता आहे.





























































